Join us  

बॉलिवूडचे बडे अभिनेते गीतकाराला स्वातंत्र्य देतात का? स्वानंद किरकिरे स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:54 AM

Lokmat Sahitya Mahotsav 2024 कार्यक्रमात स्वानंद किरकिरे यांची मुलाखत, बावरा मन या गाण्यामागची कहाणीदेखील सांगितली

Swanand Kirkire Interview: ठाणे: 'थ्री इडियट्स', 'लगे रहो मुन्नाभाई', 'बर्फी' या लोकप्रिय चित्रपटांतील गाणी लिहिणारे, दोन वेळा गीतलेखनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले, ज्येष्ठ गीतकार स्वानंद किरकिरे यांनी आज लोकमत साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. बॉलिवूडमधील विविध अभिनेत्यांसोबतचे किस्से, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण आणि हिंदी-इंग्रजीचा भडीमार असलेल्या चित्रपटसृष्टीत मराठी म्हणून नाव कमावतानाचे अनुभव या मुद्द्यांवर स्वानंद किरकिरे यांनी भरपूर गप्पा मारल्या. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये  अपर्णा पाडगावकर यांनी स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेतली. या सोहळ्यात  ज्येष्ठ लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांना लोकमत साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर, ज्येष्ठ गीतकार स्वानंद किरकिरे, अभिनेता-कवी किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बॉलिवूडचे बडे अभिनेते गीतकाराला स्वातंत्र्य देतात?

अभिनेता व निर्माता आमिर खान असो किंवा इतरही बॉलिवूडचे बडे अभिनेते असोत, ते गीतकाराला स्वातंत्र्य देतात का? असा प्रश्न स्वानंद किरकिरेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "मी देखील असं ऐकून होतो की बडे अभिनेते गीतकाराला ते स्वातंत्र्य फारसं देत नाहीत. पण मला असा अनुभव कधीच आला नाही. कदाचित मी सामर्थ्यवान आणि बड्या दिग्दर्शकांसोबत कामं केली त्यामुळे कदाचित मला तसा अनुभव आला नसावा. मी दिग्दर्शकांसोबत काम केलं. त्यामुळे सिनेमाच्या कथानकाबरोबर मॅच होणारी गाणी लिहिणं हे माझं काम आहे. ते मला योग्य करायला मिळतं. मी संजय दत्त सोबत लगे रहो मुन्नाभाई मध्ये काम केलं, आमिर खान सोबत थ्री इडियट्समध्ये काम केलं, पण हे लोक कशाच्याही मध्ये येत नव्हते," असे अतिशय स्पष्टपणे स्वानंद यांनी सांगितले.

'बावरा मन' गाण्यामागची कहाणी काय?

"माझे आई वडील कुमार गंधर्व यांचे शिष्य. कानावर गाण्याचे खूप संस्कार होते. मराठी व्यावसायिक नाटकांच्या प्रेमात होतो. NSD मध्ये माझ्याकडे गाणं आहे, मी लिहू शकतो ही जाणीव झाली. पुढे act 1 नावाचा ग्रुप होता. तिथे पियूष मिश्राची भेट झाली. आणि असंच एक बावरा मान गाणं मुंबईत जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा लिहून ठेवलं होतं. मित्रांसमोर गुणगुणत असायचो. सुधीर मिश्रांना मी असिस्ट करत असे. त्यावेळी केके मेननला मी ते गाणं ऐकवलं होतं आणि मग फिरत फिरत ते गाणं सुधीर मिश्रांकडे पोहोचलं. मग त्यांनी पिक्चरमध्ये ते वापरायचं असं ठरवलं. मला वाटलं शोभा मुद्गल वगैरे गातील, पण तेव्हा शांतनु मोईत्रा म्हणाले की हे गाणं तूच गायचं. मग मी रेकॉर्डिंगरूम मध्ये गेलो. सुरूवातीला मी घाबरलो होतो. त्यांनी मला बाहेर बोलावलं आणि मला समजावलं. मग बाहेरच उभं राहून मी ते गाणं रेकॉर्ड केलं आणि तेच आता तुम्ही ऐकता," असा किस्सा त्यांनी सांगितला.

तेव्हा सरकारच्या पैशाने सरकारविरूद्ध बोलू शकत होतो!

"मी NSD पास झालो, तेव्हा देश स्वतंत्र होऊन ५० वर्ष झाली होती. मी रेपर्टरी कोर्समध्ये एक इंग्रजी नाटक करणार होतो, पण नंतर आमचे वरिष्ठ राम गोपाल बजाज यांनी 'भगतसिंग के दस्तावेज' हे पुस्तक मला दिलं आणि यावर काहीतरी कर असं मला म्हणाले. मी ते वाचलं, भगतसिंग हा फार मोठा माणूस होता. तो जितकी वर्ष जगला, तितकी वर्ष त्याने काहीतरी शिकायचा प्रयत्न केला. भगतसिंग गेल्यावर अनेक संघटना त्याला आपलंसं करायचा प्रयत्न करत होते. तो काळ असा होता की आम्ही सरकारी पैशाने सरकारविरुद्ध बोलू शकत होतो. २० वर्षानंतरही दिग्दर्शक म्हणून मला भगतसिंग करायला आवडेल. भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्यावर आज आणि पुन्हा पुन्हा बोलावं लागेल," अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी मांडली.

यंदाच्या लोकमत साहित्य पुरस्काराचे मानकरी

  • जी. के . ऐनापुरे: ओस निळा एकांत (कादंबरी)
  • पांडुरंग सुतार : ते लोक कोण आहेत? (काव्यसंग्रह)
  • जयप्रकाश सावंत: भय्या एक्स्प्रेस आणि इतर कथा (अनुवाद)
  • हिनाकौसर खान: धर्मरेषा ओलांडताना - आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती (वैशिट्यपूर्ण)
  • केशव चैतन्य कुंटे : भारतीय धर्मसंगीत (विशेष प्रयोग)
  • वीणा गवाणकर : किमयागार कार्व्हर (बालसाहित्य)
  • अंजली चीपलकट्टी : माणूस असा का वागतो? (वैशिष्टयपूर्ण)
  • प्रसाद निक्ते : वॉकिंग ऑन द एज (पर्यावरणविषयक)
  • रामदास भटकळ : जीवनगौरव (पॉप्युलर प्रकाशन)
टॅग्स :स्वानंद किरकिरेआमिर खानसंजय दत्त