प्रेक्षकांचे हसून हसून भरपूर मनोरंजन व्हावे यासाठी विनोदी चित्रपट आवर्जून बनवले जातात. या विनोदी चित्रपटांच्या टॅगखाली विविध प्रयोगही केले जातात. त्यात काही प्रयोग यशस्वी ठरतात तर काही अपयशी. क्रेझी कुक्कड फॅमिली हा कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. यात एक अतरंगी कुटुंब आहे. जे संपत्ती मिळविण्यासाठी आपल्या कोमात गेलेल्या वडिलांच्या मरणाची वाट पाहत आहे.कुक्कड फॅमिलीतल्या वडिलांना चार मुले आहेत. सगळ्यात मोठा पवन (स्वानंद किरकिरे), मुलगी अर्चना (शिल्पा शुक्ला), मधला अमन (कुशल पंजाबी), सगळ्यात छोटा अभय (सिद्धार्थ शर्मा). हे चौघे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांना सोडून वेगळे राहत असतात. त्यांचे वडील कोमात असल्याचे त्यांना कौटुंबिक वकिलांकडून समजते. या चौघांनाही पैशांची समस्या आहे. पवनला एका राजकारण्याचे ५० कोटींचे कर्ज चुकवायचे आहे. अर्चनाला फॅशनच्या दुनियेत चमकायचे आहे. वडिलांच्या संपत्तीतून त्याचे निरसन करता येणार असल्याची जाणीव त्यांना होते. त्यामुळे संपत्तीच्या मोहापायी ते लगेच वडिलांना भेटायला येतात. अमन अमेरिकेहून आपल्या परदेशी मैत्रिणीसोबत तर न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या अभयने समलैंगिक संबंधातून लग्न केले आहे. संपत्ती मिळविण्यासाठी सगळेच जण वेगवेगळे प्रयत्न करीत असल्याचेही एकेकाच्या लक्षात येते. शेवटी सत्य समोर आल्यावर मुलांचे डोळे उघडतात; आणि कुटुंब पुन्हा एकत्र येते.उणिवा - रितेश मेननने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट. त्याच्याकडे अनुभवाची कमतरता तर होतीच; पण खूप कमकुवत कथा असल्याने सगळाच बोऱ्या वाजला. तसे पाहिले तर चित्रपटाची कथा चांगली होती. त्यावर तेवढीच चांगली पटकथा लिहिण्यात मात्र अपयश आले. चित्रपटाची दृश्येही मोठी आहेत आणि प्रत्येकाला स्वत:ची कथा देतानाही चित्रपटाने गोंधळ केला आहे. चित्रपटाच्या मूळ कथेपेक्षा स्वानंद किरकिरेच जास्त लक्ष वेधून घेतो. त्यामुळे चित्रपटाचे संतुलन पुरते बिघडले. आपली भूमिका समजूच न शकल्याने शिल्पा शुक्लाची निवडही चुकीची ठरली. कुशल पंजाबी आणि सिद्धार्थ शर्मा यांनीही जेमतेम काम केले आहे. चित्रपटाचे संगीतही वाईट असून, तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट निराश करतो. दिग्दर्शक म्हणून रितेश मेननने निराश केले आहे.वैशिष्ट्ये - काही विनोदी आणि भावनिक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. काही संवादही मजा आणतात. पूर्वार्धात चित्रपट मजा आणतो.
फॅमिलीची कंटाळवाणी गोष्ट...!
By admin | Updated: January 16, 2015 22:58 IST