मराठीसह चार भाषांत तयार झालेल्या ‘कोर्ट’ या बहुचर्चित चित्रपटाला भारतात आॅस्करसाठी नामांकित करण्याचा आनंददायी निर्णय झाला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळविणाऱ्या या चित्रपटाने यापूर्वीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रशंसा मिळविली आहे. एखाद्या भारतीय चित्रपटाने आॅस्कर मिळविण्याची गेल्या कित्येक वर्षांतील आशा यानिमित्ताने पूर्ण व्हावी, अशी ईश्वराजवळ प्रार्थना आहे.यंदा आॅस्करसाठी चित्रपटाचे नामांकन करण्यावरून ज्युरीचे चेअरमन अमोल पालेकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राहुल रवैल यांच्यात जे काही झाले ते दुर्दैवी होते. मतभेदांमुळे राहुल रवैल यांनी दिलेला राजीनामा योग्य नाही. चर्चा करून समस्या सोडवून मतैक्याने निर्णय व्हायला हवा होता. अशा प्रसंगातून चित्रपट उद्योग किती पोकळ आहे हे सिद्ध होते, ही एक दु:खद बाब आहे. अशा प्रकरणांमुळेच बॉलीवूडमधील समस्या वाढत चालल्या आहेत. त्यातच एकजूट नसल्याने बॉलीवूडच्या समस्या सोडविण्यात दिग्गज गंभीर नाहीत हे दिसून येते.ही घटना पाहिली तर ‘कोर्ट’ला आॅस्कर मिळविण्याच्या मार्गातील अडथळे किती आहेत हे स्पष्ट होते. आॅस्करमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग आणि स्क्रीनिंगची व्यवस्था करावी लागते. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. ‘कोर्ट’चे बजेट पाहता आॅस्करसाठी लागणारे लॉबिंग आणि अन्य व्यवस्थेसाठी ‘कोर्ट’च्या निर्मात्यांना एवढ्या पैशाची व्यवस्था करणे सोपे नाही असे दिसते.यापूर्वीही जेव्हा मराठी चित्रपटाला आॅस्करसाठी नामांकित करण्यात आले, त्या वेळीही अमेरिकेत त्या चित्रपटांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. परिणामही निराशाजनक होता. आॅस्करसाठी कोणत्याही भाषेतील चित्रपटाला नामांकित केले तरी आॅस्करच्या व्यासपीठावर तो भारताचे प्रतिनिधित्व करतो, हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्यासाठी सरकारपासून कॉर्पोरेटने पुढे येण्याची गरज आहे. या सर्वांनी पुढाकार घेतल्यास ‘कोर्ट’समोर वित्तीय समस्या येईल असे वाटत नाही. सर्वांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. याबाबत ‘कोर्ट’ची टीम आणखी एक प्रयत्न करू शकते.यापूर्वी आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपट आॅस्करच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. आता या दोघांनी त्या अनुभवाच्या आधारे एक रणनीती निश्चित करावी; जेणेकरून ‘कोर्ट’च्या टीमपुढे समस्या येऊ नयेत आणि पुरस्कार जिंकण्यासाठी आशा निर्माण झाली पाहिजे. पुरस्कार जिंकणे न जिंकणे या वेगळ्या बाबी आहेत; पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्यास नक्कीच समाधान मिळते. किमान प्रयत्न केल्याचे तरी समाधान मिळते. पुन्हा एकदा ‘कोर्ट’ला शुभेच्छा!
‘कोर्ट’च्या आॅस्करसाठी सर्वांचे प्रयत्न हवेत
By admin | Updated: September 26, 2015 23:06 IST