Join us

विनोदाचा फुल तडका ‘दगडाबाईची चाळ’

By admin | Updated: October 12, 2015 04:46 IST

मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून ‘दगडाबाईची चाळ’ हा चित्रपट दत्तात्रय भगूजी हिंगणे यांनी निर्मित केला आहे. पटकथा-दिग्दर्शन सुनील वाईकर यांचे आहे

मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून ‘दगडाबाईची चाळ’ हा चित्रपट दत्तात्रय भगूजी हिंगणे यांनी निर्मित केला आहे. पटकथा-दिग्दर्शन सुनील वाईकर यांचे आहे. यात विशाखा सुभेदारसह संग्राम साळवी, मोहिनी कुलकर्णी, भूषण कडू, श्वेता पगार, कमलाकर सातपुते, किशोर चौगुले, माधवी जुवेकर, सुनील गोडबोले, जॉनी रावत, प्रशांत तपस्वी, संतोष चोरडिया अशा एकसे बढकर एक मराठीतील एकपात्री कलाकारांचा भरणा आहे. त्यामुळे विनोदाचा फुल तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. नोक-झोक, टोमणे या भाडेकरूंच्या त्रासाबरोबरच दयाळू असलेल्या चाळीच्या मालकीण दगडाबाई हिला करावा लागणारा अडचणींचा सामना आणि तिच्या कनवाळू स्वभावाचा भाडेकरू घेत असलेले गैरफायदा याचे चित्रण खमंग विनोदातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशचा भय्या असलेला ‘जिलेबीवाला.’ या चित्रपटात राजपाल यादव ही भूमिका साकारणार आहे. निरागस, उत्स्फूर्त विनोदासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राजपाल यादव याने ‘मालामाल विकली’, ‘भूलभुलय्या’, ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले, आता तो मराठीकडे वळला आहे. या चित्रपटाविषयीच्या अनुभवाबद्दल तो सांगतो, इतर भाषांप्रमाणेच मराठीवर माझे खूप प्रेम आहे. मराठी चित्रपटाला एक इतिहास आहे, अगदी ‘टिंग्या’, ‘मी शिवाजीराव भोसले बोलतोय’ अशा अनेक चित्रपटांनी स्वत:ची जागा निर्माण केली. मराठी चित्रपटांच्या आशयघन निर्मितीमुळे जगभरात त्यांची दखल घेतली जात आहे. ‘हिंदी अगर मेरी मॉँ है, तो मराठी मेरी मौसी है.’ महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मराठी संस्कृती, भाषा, बोली यांचा हिंदीबरोबरच मी आदर करतो. देशात ज्या १४ भाषा बोलल्या जातात, त्या सगळ्या शिकण्याची माझी इच्छा आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीला गेल्या ३० वर्षांपासून मी फॉलो करीत आहे. या रंगभूमीने अनेक दिग्गज कलाकार दिले, त्यात मोहन गोखले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. रंगमंचावर आल्यावर भल्याभल्यांना चीत करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभिनयात होते. उत्स्फूर्तता आणि संवेदनशीलता या दोन गोष्टी रंगभूमीवरच पाहायला मिळतात. कलेला मी आईचा दर्जा दिला आहे. त्यामुळे वाट्याला कोणता रोल आला आहे, याचा मी विचार करीत नाही. कलेमध्ये नवरस आढळतात, मनोरंजन, गंभीर, विनोदी अशा शेड्स भूमिकांमध्ये मला द्यायला निश्चितच आवडतात. म्हणूनच जंगल, कंपनी चित्रपटातील भूमिकांना रसिकांनी उचलून धरले. ‘दगडाबाईची चाळ’ ही चाळीमध्ये घडणाऱ्या घटनांची कहाणी आहे. मुळात चाळ म्हटली की डोक्यात येते ती माणसांची एकी... भावनांची गुंतवणूक. या गोष्टी आज जीवनातून दुरपास्त झाल्या आहेत. एकमेकांबद्दलचा आदर इथे प्रतित होत असतो. म्हणून या विषयाला प्राधान्य दिले असल्याचे ते सांगतात. एक विनोदीप्रधान चित्रपट म्हणून ‘दगडाबाईची चाळ’कडे पाहता येईल. ‘जिलेबीवाला’ या भूमिकेसाठी राजपाल यादव हेच नाव डोक्यात होते. हिंदी भाषक व्यक्ती मराठी बोलताना त्यातून विनोद कसा प्रतित होईल, हेच दाखवायचे होते. त्यामुळे ही भूमिका खऱ्या अर्थाने जिवंत झाल्यासारखी वाटत असल्याचे सांगून दिग्दर्शक सुनील वाईकर यांनी यादव यांचे कौतुक केले.