Join us  

Dasvi Movie Review: ३५ टक्के काठावर पास!, जाणून घ्या अभिषेक बच्चनच्या 'दसवीं' चित्रपटाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 11:14 AM

Dasvi Movie Review: जाणून घ्या कसा आहे, अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan), निमरत कौर (Nimrat Kaur) आणि यामी गौतम(Yami Gautam)चा 'दसवीं' चित्रपट

कलाकार - अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan), निमरत कौर (Nimrat Kaur) आणि यामी गौतम(Yami Gautam)

दिग्दर्शक - तुषार जलोटा

कालावधी - २ तास ५ मिनिटं

स्टार - २ स्टार

परीक्षण - संजय घावरे

 

तुषार जलोटा दिग्दर्शित 'दसवीं' (Dasvi Movie) हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा असेल असं टायटलवरून वाटतं. त्यानुसार चित्रपटातही राजकारण आणि शिक्षण व्यवस्थेची सांगड घालण्यात आली आहे. अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan), यामी गौतम (Yami Gautam) आणि निमरत कौर (Nimrat Kaur) या मुख्य भूमिकेतील कलाकारांच्या सुंदर अभिनय मन मोहून घेणारा असला तरी पटकथेतील त्रटी आणि दिग्दर्शनातील कच्चे दुवे यांमुळं हा चित्रपट ३५ टक्के काठावर पास झाल्याचं म्हणावं लागत आहे.

बिनधास्त वृत्तीचे आणि राजकारणात मुरलेले हरित प्रदेशचे मुख्यमंत्री गंगाराम चौधरी शिक्षक भरती घोटाळ्यात अडकल्यानं तुरुंगात पोहोचतात. तिथे त्यांची भेट त्यांनीच बदली केलेल्या ज्योती देसवाल या धडाकेबाज महिला तुरुंगाधिकाऱ्याशी होते. तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय ज्योती मुख्यमंत्र्यांनाही इतर कैद्यांप्रमाणे वागणूक देते. तिकडे चौधरी तुरुंगात गेल्यानं त्यांची पत्नी विमलादेवी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होते. या सर्व गदारोळात अशिक्षीत असलेले चौधरी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचं आव्हान स्वीकारतात. त्यानंतर जे घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं.

विषय खूप छान असला तरी पटकथेची मांडणीही तितकीच सुरेख हवी होती. कलाकारांचा दमदार अभिनय ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मंद गती या चित्रपटातील मुख्य अडथळा आहे. स्वाक्षरीच्या नावाखाली केवळ पाच ओळी आणि टिंब देणारा मुख्यमंत्र्यांना इंग्रजीतील वाक्याच्या अर्थ समजतो हे कोडं उलगडत नाही. याखेरीज इंग्रजीतील इतिहासाची पुस्तकं सहजपणे वाचतो. इथल्या कैद्यांना युनिफॅार्म नाही. अशा बऱ्याच बारीकसारीक डिटेलिंगवर तुषार यांनी लक्ष देणं गरजेचं होतं. मुख्यमंत्री आणि तुरुंगाधिकारी यांच्यातील सुरुवातीची तू तू मैं मैं चांगली वाटते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं पतीविरोधात बंड करणं यापूर्वी वेब सिरीजमध्ये पाहिलं आहे. इतर तांत्रिक गोष्टी चांगल्या आहेत. बोलीभाषेवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे.

अभिषेक बच्चननं साकारलेला जाट मुख्यमंत्री लक्षात राहण्याजोगा आहे. अशा प्रकारच्या एका दमदार भूमिकेची अभिषेकला नितांत गरज होती, पण पटकथेनं घात केला आहे. तुरुंगाधिकाऱ्याच्या भूमिकेत यामी गौतमनं चाबूक अभिनय केला आहे. निम्रत कौरनं साकारलेली मुख्यमंत्र्यांची संधीसाधू व बेरकी पत्नी लक्षात राहणारी आहे. एका चांगल्या प्लॅाटवर तितकाच सुंदर चित्रपट बनला असता, तर नक्कीच दहावीच्या परीक्षेत मेरीटमध्ये आला असता.

टॅग्स :अभिषेक बच्चनयामी गौतमनिमरत कौर