ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26- हरयाणाची मनुषी चिल्लर हिनं यंदाचा "एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया" किताब पटकावला आहे. गेल्या वर्षीची मिस इंडिया प्रियदर्शनी चटर्जी हिनं मनुषीच्या डोक्यावर "मिस इंडिया"चा मुकुट चढवला. जम्मू-काश्मीरमधील सना दुआ हिनं दुसरा तर, बिहारची प्रियांका कुमारी हिनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील यशराज स्टुडियोमध्ये रविवार हा दिमाखदार सोहळा पार पडला. मनुषी चिल्लर ही मेडिकल शाखेत शिक्षण घेते तसंच तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. याआधी तिने "मिस हरयाणा"चाही किताब पटकावला आहे. आता डिसेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेत मनुषी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. मनुषीने यंदाचा मिस फोटोजेनिक अॅवॉर्डवरही आपलं नाव कोरलं आहे.
यंदाच्या स्पर्धेमध्ये काही नवीन नियम होते. 30 राज्यातील मुलींनी फेमिना मिस इंडियासाठी सहभाग नोंदवला होता. त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, उत्तराखंड तसंच झारखंड या राज्यातूनही मुली स्पर्धेत सहभाग घेतला होता. यंदा पहिल्यांदाचं फेमिना मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धेत स्पर्धकांनी भारतीय कपडे परिधान केले होते. फॅशन डिझायनर मनिषा मल्होत्रा यांनी हे कपडे तयार केले होते.
"मिस इंडिया" स्पर्धेच्या ३० दिवसांच्या काळात मनाशी एक ठाम संकल्प केला होता. मी जिंकू शकते आणि महत्त्वाचा बदल करू शकते, त्या विश्वासानेच मी स्पर्धेत उतरले होते, असं मनुषीनं या विजयानंतर बोलताना सांगितलं. डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेता अर्जुन रामपाल, अभिषेक कपूर, विद्युत जामवाल, अभिनेत्री बिपाशा बसू यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. मुंबईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि रितेश देशमुखने सूत्रसंचालन केलं तर गायक सोनू निगम, आलिया भट्ट, सुशांत सिंग राजपूत आणि रणबीर कपूर यांचे धमाकेदार परफॉर्मन्स या कार्यक्रमात बघायला मिळाले.