Join us

प्रेमाचे रेशमी बंध उलगडणारा ‘कंडिशन्स अप्लाय’!

By admin | Updated: June 16, 2017 02:55 IST

प्रेमाच्या नव्या कल्पनांचा स्वीकार आजची तरुणाई बिनधास्तपणे करू लागली आहे. तसेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्यायही आजची पिढी स्वीकारते आहे.

प्रेमाच्या नव्या कल्पनांचा स्वीकार आजची तरुणाई बिनधास्तपणे करू लागली आहे. तसेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्यायही आजची पिढी स्वीकारते आहे. आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी अभय आणि स्वरा या जोडप्याची कथा ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या टीमने ‘लोकमत’ आॅफिसमधील भेटीदरम्यान चित्रपटाची आगळीवेगळी कथा, कन्सेप्ट, गाणी यांच्यावर प्रकाश टाकला. चित्रपटाच्या प्रवासाविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला, ‘कॉपार्रेट जगतात वावरणाऱ्या अभय-स्वरा या जोडप्याची ही कथा आहे. पैसा, प्रसिद्धी, उच्च राहणीमान या साऱ्या ऐहिक सुखांमध्ये प्रेमसुद्धा हरवले आहे. लग्नाच्या बंधनात न अडकता ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय हे जोडपे घेते. एकत्र असूनही वेगवेगळे आयुष्य जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात काय घडतं? हाच चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक, लोकेशन्स यांच्याविषयी दीप्ती देवी सांगते, सध्या चित्रपटाचे सीन्स, शूटिंग, संगीत यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आता एकंदरितच चित्रपट पूर्ण व्हायला पूर्वीसारखे कष्ट पडत नाहीत. ‘कंडिशन्स अप्लाय’ या चित्रपटाच्या बाबतीतही निर्मात्यांचा तोच विचार होता. थीम, बॅकग्राऊंड म्युझिक आणि सीन्स हे अत्यंत लाईट आणि हलकेफुलके बनवण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते डॉ. संदेश म्हात्रे यांनी सांगितले,‘हा एक रोमँटिक चित्रपट आहे. सुबोध भावे आणि दीप्ती देवी ही आगळीवेगळी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आहे. या जोडीच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मी केलाय. प्रेक्षकांना ही जोडी नक्कीच आवडेल. तसेच ‘काही कळेना’, ‘तुझेच भास’ , ‘मार फाट्यावर’ ही चित्रपटातील गाणी रसिकांना आवडतील. ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत कंडिशन्स अप्लाय-अटी लागू या चित्रपटातून एका प्रेमात पडलेल्या जोडप्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. प्रेमाच्या नव्या कल्पना, नात्यांची नवी परिमाणं मानवी संबंधातील नवीन प्रवाह याविषयीचा वेध घेणारा डॉ. संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.