Join us  

कुठे गायब झाली CID मालिकेतील श्रेया, तब्बल ६ वर्षांनंतर कमबॅक करण्यास इच्छुक, म्हणते.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 4:47 PM

छोट्या पडद्यावर ९० चा काळ गाजवणारी मालिका म्हणजे सीआईडी.

CID Serial : छोट्या पडद्यावर ९० चा काळ गाजवणारी मालिका म्हणजे सीआईडी. आजही या मालिकेची क्रेझ चाहत्यांमध्ये  पाहायला मिळते. जवळपास २१ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच  मनोरंजन केलं. साधारणत: १९९८ मध्ये ही मालिका सुरु झाली, आणि २१ वर्षाच्या यशस्वी प्रवासानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

यामध्ये दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, अलाना सय्यद, अजय नागरथ, दिनेश फडणीस, तान्या अब्रॉल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. शिवाय लेडी ऑफिसर  'श्रेया' ही देखील या मालिकेचा महत्त्वाचा भाग होती. तिच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलं होत. या क्राईम ड्रामा सीरियलमध्ये दया आणि श्रेयाचा रोमँटिक अँगलही दाखवण्यात आला होता. त्यामधील दया आणि श्रेयाची जोडी लोकांना खूप आवडली. त्यांच्या केमिस्ट्रीला मिळत असलेल्या प्रेमामुळे चॅनलने दोघांचा स्क्रीन टाईमही वाढवला होता. श्रेयाची भूमिका अभिनेत्री जान्हवी छेडा हिने उत्तमरित्या वठवली. पण CID नंतर जान्हवी मनोरंजन क्षेत्रातून पूर्णपणे गायब झाली.

CID मालिकेत काम करत असताना २०११ मध्ये जान्हवीने तिचा बॉयफ्रेंड निशांत गोपालया बरोबर लग्न केलं. ‘छूना है आसमान’ या मालिकेतून अभिनेत्रीने तिच्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर बालिका वधू सारख्या सिरीयलमध्येही ती झळकली. पण खऱ्या अर्थाने जान्हवीला सीआईडी मधून खरी ओळख मिळाली. या मालिकेने तिला घराघरांत पोहचवलं. मात्र, सीआयडी बंद झाल्यानंतर जान्हवीच्या करिअरला ब्रेक लागला आणि ती इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाली.

सीआयडी संपल्यानंतर जान्हवीने तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान तिची मुलगी निर्वीचाही जन्म झाला आणि त्यानंतर जान्हवी तिचे आयुष्य आणि प्रपंचात व्यस्त झाली. आता ६ वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर  सीआयडीच्या 'श्रेया'ला टीव्हीवर 'कमबॅक' करायचे आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'मी आता छोट्या मालिकेत पुनरागमन करण्यास सज्ज आहे, आशा आहे की मला अशा ऑफर्स मिळतील ज्यात मला काम करण्याची इच्छा आहे'. मला ते कधी मिळेल, कसे मिळेल माहीत नाही, पण मला पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर यायचे आहे., असं ती म्हणाली.

टॅग्स :सीआयडीशिवाजी साटमसेलिब्रिटी