Join us  

चार्ली चॅप्लिन बर्थ डे स्पेशल : लोकांना हसवणा-या चेह-या मागचं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 12:29 PM

लोकांना हसवणा-या या चेह-यामागे किती दु:खं लपलेलं होतं, हे कदाचितच कुणाला माहित असेल. आज चार्ली चॅप्लिनचा 126वा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी... 

जगात असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल जो चार्ली चॅप्लिनच्या धमाल अदाकारीवर हसला नसेल. चार्ली चॅप्लिनचं नाव निघताच डोळ्यांसमोर विचित्र अंगविक्षेप, चेह-यावरील विचित्र हावभाव अशी विनोदी प्रतिमा उभी राहते. कॉमेडी म्हटलं की, चार्ली चॅप्लिनची आठवण झाली नाही, असं होत नाही. बॉलिवूडच्या अनेक विनोदी कलाकारांवर त्याचा प्रभाव बघायला मिळतो. पण लोकांना हसवणा-या या चेह-यामागे किती दु:ख लपलेलं होतं, हे कदाचितच कुणाला माहित असेल. आज चार्ली चॅपलिनचा 126वा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी... 

गरीब कुटुंबात जन्म

चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 ला लंडनमध्ये एका गरीब कुटुंबात झाला होता. त्याचं पूर्ण नाव चार्ल स्पेंसर चॅप्लिन असं होतं. त्याची आर्थिक परिस्थीती चांगली नसल्याने त्याला वयाच्या नवव्या वर्षापासूनच पोट भरण्यासाठी काम करावं लागलं होतं. चार्लीचे आई-वडिल हे चार्ली लहान असतानाच वेगळे झाले होते. 13 व्या वर्षी चार्लीला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. 

अभिनय क्षेत्रात काम

चार्लीने फार कमी वयातच एक कॉमेडियन म्हणून नाटकात काम करणे सुरु केले होते. नंतर तो केवळ 19 वर्षांचा असताना त्याला एका अमेरिकन कंपनीने साईन केलं आणि ती कंपनी त्याला अमेरिकेला घेऊन गेली. अमेरिकेत जाऊन चार्लीने सिनेमासाठी काम करणे सुरु केले आणि मोठा कलाकार म्हणून लोकप्रिय झाला.

पहिला सिनेमा

'मेकिंग अ लिव्हिंग' हा चार्ली चॅप्लिनचा पहिला सिनेमा 1914 मध्ये आला होता. त्याचा 'द किड' हा पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा 1921 मध्ये आला होता. चार्लीने आपल्या आयुष्यात दोन महायुद्धे पाहिली होती. जग जेव्हा युद्धात रक्ताने रंगले होते, तेव्हा चार्ली लोकांच्या चेह-यावर हास्य पेरत होता. चार्ली एकदा म्हणाला होतो की, माझं दु:खं कुणाच्यातरी हसण्याचं कारण ठरु शकतं. पण माझं हसणं कुणाच्याही दु:खाचं कारण होऊ नये.

एकही डायलॉग न म्हणता लोकांना हसवले

चार्ली ने 'अ वुमन ऑफ पॅरिस', 'द गोल्ड रश', 'द सर्कस', 'सिटी लाइट्स', 'मॉडर्न टाइम्स' यांसारख्या गाजलेल्या सिनेमात काम केलं होतं. हे सिनेमे आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात. 

वाद आणि चार्ली चॅप्लिन

आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये चार्ली अनेक वादांमध्ये अडकला होता. 1940 मध्ये आलेल्या 'द ग्रेट' हा सिनेमा चांगलाच वादात सापडला होता. कारण त्यात त्याने अॅडॉल्फ हिटलरची भूमिका साकारली होती. नंतर अमेरिकेत त्याच्यावर कम्युनिस्ट असल्याचे आरोपही लावण्यात आले. त्याची एफबीआयकडून चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर चार्लीने अमेरिका सोडलं आणि तो स्विर्त्झलंडमध्ये जाऊन स्थायिक झाला.

खाजगी आयुष्य

चार्लीचं खाजगी आयुष्य फारच उलथापालथीचं राहिलं. त्याने एकूण 4 लग्ने केली होती. या लग्नातून त्याला 11 अपत्ये झाली. त्याने पहिलं लग्न 1918 मध्ये मिल्ड्रेड हॅरीससोबत केलं होतं. पण हे लग्न केवळ 2 वर्ष टिकलं. त्यानंतर त्याने लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि 1943 मध्ये 18 वर्षाच्या उना ओनीलसोबत लग्न केलं. त्यावेळी चार्ली चॅपलिन 54 वर्षांता होता. त्याची सर्वच लग्ने वादग्रस्त ठरलीत.

हे दिग्गज होते चार्लीचे प्रशंसक

प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन आणि ब्रिटेनची राणी यांच्यासारखे लोक चार्लीचे प्रशंसक होते. तर स्व:ता चार्ली हा महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होते. 

चार्ली चॅप्लिनचा मृतहेद चोरीला

चार्ली चॅप्लिनचा मृत्यू 1977 मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. त्याच्या परीवाराकडू खंडणी मागण्यासाठी हा प्रकार करण्यात आला होता. पण नंतर त्याचा मृतदेह मिळाला आणि पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून 6 फूट कॉंक्रीट खाली पुरण्यात आला. 

टॅग्स :चार्ली चॅप्लिनसेलिब्रिटी