Join us

‘ब्रदर्स’ने मारली बाजी; कमावले ५० कोटी

By admin | Updated: August 18, 2015 03:01 IST

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या करण जोहर कंपनीच्या ‘ब्रदर्स’ने बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळविले आहे. पहिल्या आठवड्यात त्याने ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून दणक्यात

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या करण जोहर कंपनीच्या ‘ब्रदर्स’ने बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळविले आहे. पहिल्या आठवड्यात त्याने ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून दणक्यात सुरुवात केली आहे. सलग दोन दिवसांच्या आलेल्या सुट्यांचाही फायदा ‘ब्रदर्स’ला भरपूर झाला हे नाकारता येत नाही. १५ आॅगस्ट आणि दुसऱ्या दिवशी रविवार असणे त्याला लाभदायक ठरले. शुक्रवारी त्याचा गल्ला १५ कोटींपेक्षा जास्त, शनिवारी तो २१ कोटींचा तर रविवारी १५ कोटी रुपयांचा झाला. यामुळे बॉक्स आॅफिसवर त्याची चांगली सुरुवात झाली. जाणकारांच्या दृष्टीने अनेक जण कमकुवत कथा आणि विस्कळीत पटकथेमुळे नाराज आढळले तरी अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्राशिवाय जॅकी श्रॉफच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटाच्या यशात शेवटच्या हाणामारीचीही मोठी भूमिका आहे. ‘ब्रदर्स’ पहिल्याच आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन बसण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारीही त्याला चांगले संकेत मिळाले. ‘ब्रदर्स’सोबत प्रदर्शित झालेला दुसरा चित्रपट ‘गौर हरी दास’ खूपच गंभीर विषयावर तयार झालेला अतिगंभीर चित्रपट आहे. बॉक्स आॅफिसवर यासारख्या चित्रपटांना फार काही संधी मिळत नाही. असे चित्रपट प्रदर्शित होणे हेच फार मोठे यश मानले जाते. या चित्रपटाबाबतही असेच झाले आहे. मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर रितेश देशमुख व पुलकित सम्राट यांच्या ‘बंगिस्तान’ची सुरुवात फारच दुबळी ठरली व दुसरा आठवडा येईपर्यंत त्याने बॉक्स आॅफिसवरील पराभव मान्य करून फ्लॉप चित्रपटात आपले नाव दाखल केले. मुजफ्फर अली यांच्या ‘जानिसार’चीही बॉक्स आॅफिसवर अशीच फरफट झाली. बॉक्स आॅफिसवर यशाचे नवे विक्रम करणाऱ्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ची एकूण कमाई ३१५ कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ‘बाहुबली’ची कमाई ५५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम’ची कमाई ६० कोटींच्या जवळपास रेंगाळली आहे. आता त्याच्याकडून आणखी कमाईची अपेक्षा नाही. येत्या शुक्रवारी ‘आॅल इज वेल’ (ऋषी कपूर, अभिषेक बच्चन) व ‘मांझी-माऊंटेन मॅन’ (नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे) प्रदर्शित होणार आहेत. बिहारमध्ये पहाड खोदून रस्ता तयार करणाऱ्या मांझी नावाच्या व्यक्तीवर बनविलेला हा चित्रपट उत्सुकता निर्माण करणारा आहे.