Yo Yo Honey Singh Tattoo: रॅपर आणि संगीत निर्माता यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी त्याच्या गाण्यांमुळे नाही, तर टॅटूंमुळे. हनी सिंगने नुकतेच एकाच रात्रीत तब्बल तीन टॅटू गोंदवून घेतले आहेत. त्यामागची कारणेही तितकीच भावनिक आणि प्रेरणादायी आहेत. या तीन टॅटूंबद्दल सोशल मीडियावर खास भावना व्यक्त केल्या आहेत.
हनी सिंगने पहिल्यांदाच आपल्या शरीरावर थेट तीन टॅटू गोंदवून घेतले आहेत. पहिला स्पेशल टॅटू त्याने आपल्या आईसाठी काढलाय. हनी सिंगच्या आईचे नाव भूपिंदर कौर असून त्यांची सही टॅटू रूपात आपल्या शरीरावर कोरली आहे. इतकंच नाही, तर या टॅटूमध्ये पोटात वाढणाऱ्या बाळाचं एक भावस्पर्शी चित्रसुद्धा आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना हनी सिंगने लिहिलं, "मी माझा पहिला टॅटू बनवला आहे. माझ्या आईची सही. पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत महिला. आई, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे". तर दुसऱ्या टॅटूबाबत हनी सिंगने गुप्तता ठेवली आहे. दुसरा टॅटू कोणाचा आहे, त्याने सांगितलं नाही. तो म्हणाला, "मी माझा दुसरा टॅटू पोस्ट करणार नाही, कारण तो खूप वैयक्तिक आहे".
तिसरा टॅटू हनी सिंगने आपल्या लाडक्या संगीतकार ए.आर. रहमान यांच्याच्या नावाने बनवला आहे. हनी सिंगने इन्स्टाग्रामवर टॅटू गोंदवून घेतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात तो उजव्या खांद्यावर टॅटू बनवून घेताना दिसतोय. यावेळी हनी सिंग हा 'तू ही रे' हे रहमान यांचे प्रसिद्ध गाणे ऐकताना दिसला. तो म्हणतो, "हा माझा प्रेमभाव आहे. ए. आर. रहमान सरांसाठी. आय लव्ह यू सर. हे तुमच्यासाठी आहे. तुमच्या संगीताने मला आशीर्वाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आज मी एक संगीतकार आहे, त्याचे कारण तुम्हीच आहात. मी तुम्हावर कायम प्रेम करत राहीन". या व्हिडीओसोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, "एकाच रात्रीतला माझा तिसरा टॅटू — माझ्या आवडत्या living legend @arrahman सरांसाठी!! आय लव्ह यू सर, सगळ्याबद्दल धन्यवाद". या पोस्टवर नेटकऱ्यांनी हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिल्यात. तर काही जणांनी ए.आर. रहमान यांना टॅग करत हनी सिंगसोबत कोलॅब करण्याची विनंती केली आहे.