Join us  

यशराज फिल्म्सने करार रद्द करून सुशांत सिंग राजपूतला दिले होते इतके कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 10:30 AM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यशराज फिल्म्सचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मासोबत चौकशी केली आहे. त्यातून काही माहिती समोर आली आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यशराज फिल्म्सचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मासोबत चौकशी केली आहे आणि यासोबतच यशराज फिल्म्सोबत सुशांतने साइन केलेल्या करारांची प्रतदेखील मागवली होती. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सुशांतने यशराज फिल्म्ससोबत तीन चित्रपटांचा करार केला होता आणि प्रत्येक चित्रपटासाठी त्याचे मानधन स्टुडिओसोबत त्याच्या मागील चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर अवलंबून होते. तसे तर सर्वांना माहित आहे की सुशांतने यशराज फिल्म्सच्या दोन चित्रपट शुद्ध देसी रोमांस व डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शीमध्ये काम केले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंग राजपूतला डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी चित्रपटासाठी निर्मात्यांनी कॉन्ट्रॅक्टनुसार ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त मानधन दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुशांतला यशराज फिल्म्सने शुद्ध देसी रोमांससाठी तीस लाख रुपये दिले होते. यासोबत कॉन्ट्रॅक्टदेखील साइन केला होता ज्यात जर हा सिनेमा हिट झाला तर त्याला दुसऱ्या सिनेमासाठी डबल मानधन म्हणजे साठ लाख रुपये दिले जाणार. पण त्याचा दुसरा सिनेमा डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शीसाठी सुशांतला साठ लाख रुपये नाही तर 1 कोटी रुपये देण्यात आले होते. यामागचं कारण अद्याप समोर आले नाही की निर्मात्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलेल्या मानधनापेक्षा जास्त का दिले होते.

या दोन सिनेमांव्यतिरिक्त सुशांत पानी सिनेमात दिसणार होता आणि या चित्रपटासाठी सुशांत उत्सुकही होता. पण हा चित्रपट बनला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते. हा चित्रपट का बनला नाही, याचेदेखील कारण समोर आले नाही. असे म्हटले जाते की हा चित्रपट बंद होण्यामागे खरे कारण शेखर कपूर व निर्मात्यांमधील क्रिएटिव्ह डिफरेंसेस होते.

सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास लावत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतशेखर कपूर