‘पद्मावती’मध्ये चुकीचे संदर्भ : सेटवर करणी सेनेने घातला धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 22:05 IST
. करणी सेनेच्या मते संजय लीला भन्साळी राजपूत राणी पद्मावतीचे चुकीचे संदर्भ या चित्रपटात मांडत असल्याने ते विरोध करीत आहेत. सेटवर झालेल्या हिंसक घटनेमुळे भन्साळी यांना भन्साळी यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.
‘पद्मावती’मध्ये चुकीचे संदर्भ : सेटवर करणी सेनेने घातला धिंगाणा
बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांत सामील असलेले संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ‘पद्मावती’च्या सेटवर एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोधंळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा एकदा विविध चर्चाना पेव फुटले आहे. ‘पद्मावती’चे शूटिंग सध्या जयपूर येथे सुरू असून येथे लावण्यात आलेल्या सेटवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोट केली. ‘पद्मावती’मधून संजय लीला भन्साळी राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण चुकीच्या दाखवित आहे असा आक्षेप नोंदवित हा विरोध के ला जात आहे. सध्या ‘पद्मावती’चे शूटिंग जयपूर जनीकच्या जयगढ येथे सुरू आहे. या तोडफोटीच्या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून राजपूत करणी सेनेचे कार्यकर्ते ‘पद्मावती’च्या सेटवरील चित्रिकरणाच्या सामानाची फेकाफेक करताना दिसत आहेत. करणी सेनेच्या मते संजय लीला भन्साळी राजपूत राणी पद्मावतीचे चुकीचे संदर्भ या चित्रपटात मांडत असल्याने ते विरोध करीत आहेत. सेटवर झालेल्या हिंसक घटनेमुळे भन्साळी यांना भन्साळी यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. दरम्यान ‘पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रिकरण काही काळासाठी थांबविण्यात आले होते. करणी सेना या संघटनेने काही वर्षांपूर्वी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा-अकबर’च्या सेटवर गोंधळ घातला होता. ‘जोधाने अकबरच्या मुलासोबत लग्न केले होते अकबरसोबत नाही’, असे म्हणत त्यावेळी ‘जोधा-अकबर’ या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. राजस्थानात राजपूत ही राज्यकर्ती जाती समजली जाते. पारंपारिक विचारसरणी, ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती जपण्याकडे राजपूतांचा कल आहे. आपल्या इतिहासाला चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा कुणासही अधिकार नाही असे मत या जातीमध्ये असल्याने त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करीत असलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला सुरुवातीपासूनच वादाचा सामाना करावा लागतो आहे. अभिनेत्यांची अदला बदल, त्यानंतर सेटवर एका कामगाराच मृत्यू, आता थेट चित्रीकरणाशी संबध जोडून विरोध यामुळे हा चित्रपट नेहमी चर्चेत राहीला आहे. ‘पद्मावती’मध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार असून तिच्यावरील दृष्यांच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम राजस्थानात आहे. भन्साळी याचा मागील चित्रपट ‘बाजीराव-मस्तानी’चा देखील काही संदर्भांमुळे विरोध केला जात होता. आता संजय लीला भन्साळी पटकथेत बदल करतात का? हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.