Join us  

काजोलने चक्क लग्नाच्यावेळेस मीडियाला दिला होता चुकीचा पत्ता, हे होते त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 7:00 AM

काजोलने तिच्या लग्नासाठी मीडियाला चुकीच्या पत्त्यावर आमंत्रित केले होते याबद्दल तिनेच नुकतेच सांगितले.

ठळक मुद्देकाजोलने सांगितले की, मी मीडियाला खोट्या पत्त्यावर आमंत्रित केले होते. कारण मी जर त्यांना कोणताच पत्ता दिला नसता तर त्यांनी या ना त्या प्रकारे पत्ता शोधून काढलाच असता. म्हणून मी त्यांना खोटा पत्ता दिला, जेणेकरून त्यांनी तो पत्ता योग्य आहे का हे तपासू नये.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये महिला दिन साजरा केला जाणार असून हिंदी तसेच विविध भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहेत. या सगळ्या अभिनेत्री देवी या लघुपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र येणार आहेत. 

काजोलने तिच्या लग्नासाठी मीडियाला चुकीच्या पत्त्यावर आमंत्रित केले होते या अफवेबद्दल कपिलने काजोलला विचारले असता तिने सांगितले की, “होय, मी मीडियाला खोट्या पत्त्यावर आमंत्रित केले होते. कारण मी जर त्यांना कोणताच पत्ता दिला नसता तर त्यांनी या ना त्या प्रकारे पत्ता शोधून काढलाच असता... म्हणून मी त्यांना खोटा पत्ता दिला, जेणे करून त्यांनी तो पत्ता योग्य आहे का हे तपासू नये.” 

कपिलने काजोलला पुढे विचारले की फक्त ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी असल्यामुळे तू अभिनयक्षेत्रात येण्याचा विचार केलास का? कारण तनुजा यांनीच तुझ्या वतीने सुरुवातीचे दोन चित्रपट साईन केले होते. त्यावर काजोलने हसतहसत उत्तर दिले, “ही अगदीच खोटी आणि निराधार कथा आहे. माझ्या आईचा मला नेहमीच पाठिंबा होता आणि तिने मला नेहमी योग्य मार्गदर्शन केले आहे. पण मीच माझे चित्रपट साईन केले होते.”

देवी या लघुपटात काजोल, श्रुती हासन, नेहा धुपिया, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी आणि यशस्विनी दयामा या नऊ अभिनेत्री आहेत. या सर्वांनी द कपिल शर्मा शो मध्ये उपस्थित राहून कपिल शर्माच्या टीमसोबत खूप सारी मजा मस्ती केली. तसेच या लघुपटाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. हा लघुपट केवळ दोन दिवसांत चित्रित करण्यात आलेला आहे. त्यात नऊ पीडित महिला आणि त्यांच्या कथा आहेत.

टॅग्स :काजोलद कपिल शर्मा शोकपिल शर्मा