Join us  

रेड लाइट एरियावर आधारीत वेबसीरिज 'रात्रीचे प्रवासी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 5:22 PM

रेड लाइट एरियावर आधारीत वेबसीरिज 'रात्रीचे प्रवासी' नुकतीच रिलीज करण्यात आली आहे.

रेड लाइट एरियावर आधारीत वेबसीरिज 'रात्रीचे प्रवासी' नुकतीच रिलीज करण्यात आली आहे. अनिल व्ही कुमार प्रोडक्शन्सने हंगामा डिजीटल मीडियाच्या सहयोगाने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून या कार्यक्रमाच्या सर्व भागांचे दिग्दर्शन अनिल व्ही कुमार यांनी केले आहे.

या मालिकेतील प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखेचे आयुष्य अपूर्ण असून प्रत्येक व्यक्ती प्रेम, शरीर सौख्य, आश्रयाच्या शोधात आहे किंवा परिस्थितीपासून सुटकेची इच्छा आहे. ही सीरिज आता हंगामा प्ले या हंगामाच्या व्हिडियो ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या सीरिजमध्ये सुधीर पांडे, अंजू महेंद्रू, इक्बाल खान, बरखा सेनगुप्ता, पराग त्यागी, अविनाश मुखर्जी, शायनी दोशी, रेने ध्यानी, मानसी श्रीवास्तव, रेयहना पंडित आणि आकाशदीप अरोरा, प्योमरी मेहता, सुप्रिया शुक्ला आणि इंद्रेश मलिक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या शो विषयी इक्बाल खान म्हणाला की, “रात्रीचे प्रवासीने अभिनव पद्धतीने मानवी भावना रेखाटल्या आहेत. आपण मनुष्यप्राणी अतिशय पटकन एखाद्याविषयी धारणा तयार करतो. मात्र आयुष्य जगताना आपण विचारही करत नाही, अशाठिकाणी किंवा आपल्याहून सरस नसलेली व्यक्ती जीवनाचे धडे शिकवून जाते. थोडक्यात सांगायचे तर हा शो समाजाचा आरसा आहे. अनिल व्ही कुमार यांच्या समवेत पुन्हा काम करताना मजा आली. मी बऱ्याचदा त्यांच्यासोबत काम केले आहे. ते एक चांगले दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यासोबतचा अनुभव छानच असतो.”

मानसी श्रीवास्तव सांगते की, “या शो मधील माझी व्यक्तिरेखा दृष्टिकोन असलेली आहे. तिच्या आयुष्यात अतिमहत्त्वाच्या गोष्टीची कमतरता आहे. तिचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याने ती आनंदी असते. एखाद्या व्यक्तिरेखेला फार आशय असतो, मला अशा भूमिका प्रिय असतात. या कथा आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावतील, असे खात्रीने वाटते.”

बरखा सेनगुप्ता म्हणाली की, “मी साकारत असलेली व्यक्तिरेखा एका संवेदनशील आईची आहे, जिचे आपल्या मुलावर अतिशय प्रेम आहे. आई-मुलाचे प्रेम ही एक वैश्विक भावना मानली जाते. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. हा शो फारच अभिनव असल्याने रोमहर्षक अनुभव मिळाला. प्रेक्षकांनाही हा शो नक्कीच आवडेल.”

पराग त्यागी म्हणाले की, “या कथेत मी साकारत असलेली व्यक्तिरेखा नातेसंबंधातील खोली दर्शवते. ही कथा आयुष्यात मागचे सर्वकाही विसरून पुढे जाणाऱ्या एका व्यक्तीशी संबंधित आहे. हे कथानक काहीसे गुंतागुंतीचे असले तरी अत्यंत उत्कटतेने उलगडले आहे. अनिल व्ही कुमार सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला माझी आजवरची सर्वात कठीण म्हणता येईल अशी भूमिका साकारायची संधी दिली. एका टप्प्यावर प्रेक्षक माझ्या व्यक्तिरेखेसोबत स्वत:ला जोडू शकतील, याची मला खात्री वाटते.”

टॅग्स :वेबसीरिज