Join us  

"मी मराठी सिनेमांचा चाहता", विवेक अग्निहोत्रींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "ते आपल्या कामाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 12:52 PM

विवेक अग्निहोत्रींना मराठी कलाकारांचं कौतुक, म्हणाले, "बॉलिवूडमध्ये आजही..."

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या 'द व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'द काश्मीर फाइल्स'नंतर त्यांच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक होते. २८ सप्टेंबर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. करोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे. पण, हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. 

'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटात मराठी कलाकारांची फौज आहे. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. तर गिरीजा ओकनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. विवेक अग्निहोत्रींनी द व्हॅक्सीन वॉर चित्रपटाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यातील एका मुलाखतीत त्यांनी मराठी चित्रपट आणि कलाकारांविषयी भाष्य केलं. "मी मराठी सिनेमांचा चाहता आहे. मराठी चित्रपटांच्या गोष्टी या साहित्याशी जोडलेल्या असतात. मराठी कलाकार रंगभूमीवर काम करुन तिथून अनुभव घेऊन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करतात. तेव्हा त्याच्या अभिनय कौशल्याची ताकद समजते," असं ते महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, "मराठी कलाकार आपल्या कामाला कला मानतात. तर बॉलिवूडमध्ये आजही कामाकडे शोबिझ म्हणून पाहिलं जातं. माझी पत्नी पल्लवी जोशीमुळे मी मराठी कलाकारांना भेटतो. आता अनेक मराठी कलाकार माझे मित्र आहेत. द व्हॅक्सीन वॉरमध्येही अनेक मराठी कलाकार आहेत. या चित्रपटासाठी पल्लवीने गिरीजाचं नाव सुचवलं होतं. मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा सिनेमातील भूमिकेसाठी गिरीजा योग्य असल्याचं मला जाणवलं." 

अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाइल्स'ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण, 'द व्हॅक्सीन वॉर' प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ ८.१५ कोटींची कमाई केली आहे. 

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीमराठी अभिनेता