Join us  

‘इरफान खान सध्या गाणी गातोयं, रेकॉर्ड करतोय...’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 8:35 AM

इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.

बॉलिवूड अभिनेता इरफान खान लंडनमध्ये उपचार घेतोय. कालपरवा इरफानचा ताजा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत इरफान बराच अशक्त झालेला दिसला होता. अर्थात त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र नवी उमेद जागणारे होते. इरफानच्या तमात चाहत्यांना ही बाब सुखावणारी होती. आता इरफानच्या प्रकृतीबद्दल आणखी एक ताजी माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी एका कार्यक्रमात इरफानबद्दल काही अपडेट्स दिलेत. मी व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून इरफानच्या सतत संपर्कात आहे. त्याची प्रकृती हळूहळू सुधारतेय. लवकरचं तो पूर्णपणे बरा होऊन नव्या दमाने आपल्यात परतेल, असा मला विश्वास आहे. सध्या तो गातोयं, गाणी रेकॉर्ड करतोय. रेकॉर्ड केलेली ही गाणी तो मला न चुकता व्हाट्सअ‍ॅपवर पाठवतो. तो गातोय, क्रिकेट बघतोय, असे विशाल भारद्वाज यांनी यावेळी सांगितले.

इरफान व विशाल भारद्वाज हे चांगले मित्र आहेत. ‘मकबूल’, ‘7 खून माफ’, ‘हैदर’ अशा अनेक चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले आहे. याशिवाय इरफानला घेऊन विशाल आणखी एक चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाची घोषणाही झाली होती. मात्र याचदरम्यान इरफानच्या आजाराची माहिती समोर आल्याने हे शूटींग रखडले आहे.

इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता. काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो.  तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ अशा आशयाची ही कविता इरफानने शेअर केली होती. त्याआधी इऱफानने आपल्या आजाराबाबतचा खुलासा सोशल मीडियावरुन केला होता.''मला न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजार झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार स्वीकारणे सोपे नाही. पण माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे माझी आशा कायम आहे. उपचारासाठी मी विदेशात जातो आहे.'' 

टॅग्स :इरफान खान