Join us  

विद्युत जामवालला 'जंगली'च्या शूटिंगवेळी मिळाली 'ही' शिकवण

By तेजल गावडे | Published: March 23, 2019 9:30 AM

बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवाल लवकरच 'जंगली' चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवाल लवकरच 'जंगली' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'जंगली' चित्रपट व तुझ्या भूमिकेबद्दल सांग?'जंगली' चित्रपटाची कथा हत्तीच्या दंत तस्करीवर आधारीत आहे. जेव्हा मला जंगली चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकवली त्यावेळी मी खूप खूश होतो कारण यात अ‍ॅक्शन आहे. चित्रपट निर्मात्यांना यात कमांडो चित्रपटासारखी अ‍ॅक्शन नको होती. त्यामुळे सुरूवातीलाच हा चित्रपट कौटुंबिक व बच्चेकंपनीच्या दृष्टीने बनवायचे ठरले. यातही अ‍ॅक्शन आहे पण वेगळे आहेत. प्राण्यांसोबत अ‍ॅक्शन चित्रपट आतापर्यंत बनलेले नाहीत. हाथी मेरे साथी, माँ हे चित्रपट तीस वर्षांपूर्वी बनले आहेत. आता इतक्या वर्षानंतर प्राण्यांवर हिंदीत चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील सर्व प्राणी खरे आहेत. व्हीएफएक्सचा वापर अजिबात केलेलe नाही. या चित्रपटात मी राजची भूमिका साकारतो आहे. जो प्राण्यांचा डॉक्टर आहे. त्याच्यामध्ये प्राण्यांशी संवाद साधण्याची क्षमता आहे. तो यशस्वी व प्रेमळ व्यक्ती आहे. त्याच्या आयुष्यात कलारीपायटू मार्शल आर्ट व प्राण्यांची खूप आवड असते. त्याचे जास्त प्रेम हत्तींवर असते. 

राजच्या भूमिकेसाठी तू काय तयारी केली?या भूमिकेसाठी खूप काही तयारी केली नाही. या चित्रपटातील हत्तींसोबत खूप वेळ व्यतित केला. त्यांच्याशी फ्रेंडली झालो. असे नव्हते की उद्या भोलासोबत सीन शूट करायचा. तर सकाळी शूटला जायचो तेव्हा भोला जी रिअ‍ॅक्शन द्यायचा ते शूट करायचो.

हॉलिवूड दिग्दर्शक चक रसेल यांच्याबद्दल काय सांगशील?हॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट बनवणारे चक रसेल यांनी हिंदीत पहिला चित्रपट बनवला आणि त्यात अ‍ॅक्शन स्टार म्हणून माझी निवड केली, माझ्यासाठी ही खूप मोठी बाब आहे. त्यांच्यासोबत काम करायला मिळाले त्यासाठी स्वतःला मी खूप नशीबवान समजतो.

मराठी अभिनेत्री पूजा सांवतबद्दल काय सांगशील? मला पूजाची सर्वात गोष्ट भावली ती म्हणजे तिचा साधेपणा. तिने मराठी चित्रपटात खूप काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री असून तिला अजिबात इगो नाही. तिला सेटवर कसे वावरायचे हे खूप चांगले माहित आहे. ती कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे. ही मोठे स्टार होण्याची लक्षण आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील असून देखील स्वतःच्या कर्तृत्वावर आज ती इथपर्यंत पोहचली आहे. या गोष्टीमुळे तिचा मला अभिमान वाटतो.

या चित्रपटाचा अनुभव कसा होता?खूप छान अनुभव होता. मी प्राण्यांकडून माणुसकी शिकलो आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी शिकवण होते. जर तुम्ही प्राण्यांना चांगली वागणूक दिली तर ते देखील आपल्याशी चांगले वागतात. प्राण्यांसोबत काम करणे खूप चॅलेंजिंग होते. हा खूप मजेशीर अनुभव होता. सेटवर अजिबात नकारात्मक वातावरण नव्हते. त्यामुळे खूप मजा आली.

तू मार्शल आर्ट्सचे धडे कधीपासून गिरवतो आहेस आणि याचा फायदा तुला बॉलिवूडमध्ये झाला का?नुकतेच मला आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्शल आर्ट्ससाठी पुरस्कार मिळाला. बालपणापासून मी मार्शल आर्ट्सचे धडे घेत आहे. माझे शिक्षण त्यातच झाले. लहानाचा मोठा मी आश्रमामध्ये झालो आहे. मी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नव्हता. मॉडेलिंग करत असताना समजले की बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन हे खूप मोठे जॉनर आहे. त्यामुळे अ‍ॅक्शन चित्रपटात काम करून अभिनेता बनायचे ठरवले आणि माझ्यासाठी ही योग्य दिशा ठरली. 

आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?'पॉवर' चित्रपटात मी नुकतेच काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. यात गँगस्टर ड्रामा व प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. याशिवाय मी 'कमांडो ३' चित्रपटात देखील काम केले आहे. ज्याचे जवळपास चित्रीकरण संपले आहे. यातील फक्त एक गाणे चित्रीत करायचे बाकी आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.'कमांडो ३' मध्ये 'कमांडो'च्या आधीपेक्षा वेगळे अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. 

 

 

टॅग्स :जंगलीविद्युत जामवालपूजा सावंत