मुंबई - दूरदर्शनवरील प्रसिद्ध नुक्कड मालिकेतील खोपडीची भूमिका साकारणारे अभिनेता समीर खाखर यांचे निधन झाले आहे. समीर खाखर यांना श्वास घेण्यास त्रास होता तसेच अन्य आजाराने ते ग्रस्त होते. मंगळवारी दुपारी अचानक समीर खाखर यांची तब्येत बिघडली. त्यानंतर समीर यांना बोरिवलीच्या एम एम रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याठिकाणी समीर खाखर यांची प्राणज्योत मालवली.
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते९० च्या दशकातील चित्रपटांमध्ये समीर खाखर हे एक प्रसिद्ध नाव बनले होते. पण, काही काळानंतर त्यांनी अभिनय जगताचा निरोप घेतला. एवढेच नाही तर १९९६ मध्ये ते देश सोडून अमेरिकेत राहू लागले. समीर खाखर यांनी अमेरिकेत अभिनय न करता जावा कोडर म्हणून नोकरीला सुरुवात केली.
मंदीचा फटका नोकरीला बसलाअमेरिकेत काम करत असताना समीर आनंदी होते, पण २००८ मध्ये तिथल्या मंदीनंतर त्यांची नोकरी गेली. एका मुलाखतीत समीर खाखर म्हणाले होते की, मी अमेरिकेत राहून आनंदी आहे आणि तिथे मला अभिनेता म्हणून कोणीही ओळखत नाही. यामुळेच मला अभिनय सोडून इतर क्षेत्रात हात आजमावावा लागला. मी देशात असतानाही मला कामाच्या फारशा ऑफर्स मिळाल्या नाहीत आणि ज्या मला मिळाल्या त्या 'नुक्कड' या मालिकेत साकारलेल्या पात्रासारख्या होत्या.
वेब सीरिजमध्येही दिसलेसमीर यांनी 'नुक्कड' या मालिकेतून अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ते दूरदर्शनच्या 'सर्कस' या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारताना दिसले. समीर यांनी डीडी मेट्रोच्या 'श्रीमान श्रीमती' या मालिकेत चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिकाही साकारली होती. याशिवाय 'संजीवनी' या मालिकेतही त्यांनी गुड्डू माथूरची भूमिका साकारली होती. याशिवाय 'हसी तो फसी', 'जय हो', 'पटेल की पंजाबी शादी' यांसारख्या चित्रपटात काम केले. समीर खाखर झी ५ च्या सनफ्लॉवर वेब सीरिजमध्येही दिसले होते.