Join us  

वाढदिवशी काजोलची चाहत्यांना अनोखी भेट! ‘हेलिकॉप्टर ईला’ ट्रेलर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:02 PM

काजोलच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना नेहमीच असते. लवकरच काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज ५ आॅगस्टला काजोलच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. 

काजोलच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना नेहमीच असते. लवकरच काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज ५ आॅगस्टला काजोलच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला काजोलचा पती अजय देवगण हाही उपस्थित होता. या चित्रपटाद्वारे काजोल दीर्घकाळानंतर रूपेरी पडद्यावर वापसी करतेय. हा चित्रपट एका आई व लेकाची कथा आहे. यात काजोलने एका २२ वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका साकारली आहे. सिंगल पॅरेंट असलेली काजोल मुलाच्या प्रेमात इतकी गढून जाते की, स्वत:चाही तिला विसर पडतो. सतत मुलाच्या अवती-भवती राहण्याच्या प्रयत्नात पुढे या माय-लेकाचे नाते नको इतके कटू होते.

मॉडर्न पॅरेंटींग या विषयावरची नाविण्यपूर्ण कथा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नेहा धूपिया ही सुद्धा यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर मजेशीर आहे.काजोल व अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसचा हा चित्रपट प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा एका गुजराती नाटकावर आधारित आहे, प्रदीप सरकार यांनी एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय दमदार आहे. प्रेक्षक हा चित्रपट पडद्यावर पाहतील, तेव्हा यातील प्रत्येक पात्राच्या प्रेमात पडतील, असे ते म्हणाले होते. काजोल अभिनय करत नाही तर तिच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी कोळून पिते. तिच्यात एक जादू आहे, जी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. ईलाच्या रूपातही प्रेक्षकांना ती आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

 

टॅग्स :काजोल