Join us  

या अभिनेत्याने रांग न लावता केले मतदान, हे पाहाताच भडकल्या काही महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 4:12 PM

प्रत्येकाने वेळात वेळ काढून मतदान केले पाहिजे असे विविध माध्यमांद्वारे लोकांना आवाहन केले जात आहे. सेलिब्रेटीदेखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत आहे.

ठळक मुद्दे पोलिसांनी मध्यस्ती करत अजित आणि त्याची पत्नी शालिनी यांना ते पोलिंग पुथच्या आत घेऊन गेले. पण अजित आणि शालिनी यांना रांग न लावता पोलिस आतमध्ये घेऊन जात आहेत हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या दोन महिला भडकल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केल

सध्या लोकसभेचे वारे सगळीकडे वाहत आहेत. प्रत्येकाने वेळात वेळ काढून मतदान केले पाहिजे असे विविध माध्यमांद्वारे लोकांना आवाहन केले जात आहे. सेलिब्रेटीदेखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत आहे. पण या सगळ्यात अभिनेता अजितने केलेले मतदान चांगलेच चर्चेत आले आहे. 

अभिनेता अजितने आजवर अनेक हिट दाक्षिणात्य सिनेमे दिले आहेत. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याला दक्षिणेत चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तो जिथेही जातो, तिथे त्याचे फॅन्स त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी, त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी गर्दी करतात. थिरूवान्मियुर येथील एका शाळेत तो नुकतेच मतदानासाठी गेला होता. तिथे त्याला पाहाताच लोकांनी प्रचंड गर्दी केली. लोक त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. त्या गर्दीला आवरणे अजितला कठीण जात होते.

शेवटी पोलिसांनी मध्यस्ती करत अजित आणि त्याची पत्नी शालिनी यांना ते पोलिंग पुथच्या आत घेऊन गेले. पण अजित आणि शालिनी यांना रांग न लावता पोलिस आतमध्ये घेऊन जात आहेत हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या दोन महिला भडकल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या महिलांना सगळी परिस्थिती समजून सांगत त्यांना शांत केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीजण अजितच्या बाजूने बोलत आहेत तर काहींच्या मते अजितने रांगेत उभे राहूनच मतदान करायला पाहिजे होते. 

 

एका युझरने हा व्हिडिओ पाहून अजित आणि शालिनी यांचे कौतुक केले आहे. त्या दोघांनी रांगेत उभे न राहाता मतदान केले हे योग्य असल्याचे या युझरचे म्हणणे आहे. ते अजून काही वेळ रांगेत उभे राहिले असते तर आणखी गर्दी वाढली असती आणि प्रकरण नियंत्रणाच्या बाहेर गेले असते असे त्याचे म्हणणे आहे. तर एका युझरच्या मते दाक्षिणात्य अभिनेता विजय, तसेच दक्षिणेतील इतर सेलिब्रेटींप्रमाणे अजितने देखील रांगेत उभे राहूनच मतदान करणे गरजेचे होते.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९