Join us

ट्विंकल खन्नाने सांगितला पहिल्या मासिक पाळीचा अनुभव; म्हटले, ‘शाळेच्या कॅटिनमध्ये...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 17:40 IST

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनदरम्यान तिच्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव सांगितला. वाचा सविस्तर!

बॉलिवूड अभिनेत्री तथा निर्माती ट्विंकल खन्ना सध्या तिच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत निर्मित ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ट्विंकल आणि तिच्या ‘पॅडमॅन’च्या टीमने सॅनेटरी पॅड्ससारख्या वर्जित विषयाची आपल्या चित्रपटासाठी निवड केली. सध्या ट्विंकलसह ‘पॅडमॅन’मध्ये मुख्य भूमिकेत असलेला तिचा पती अक्षयकुमार हाच विषय घेऊन लोकांशी संवाद साधत आहेत. मुंबई येथे प्रमोशनसाठी आलेल्या ट्विंकलने तर अतिशय बिंधास्तपणे तिच्या आयुष्यातील एक घटनेचा उलगडा केला. वास्तविक तिने सांगितलेली ही घटना आजही समाजात चर्चिली जात नाही. ट्विंकलने एका प्रेक्षकाशी बोलताना म्हटले की, ‘मला आठवते जेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होती तेव्हा मला मासिक पाळीविषयी सांगण्यासाठी माझ्यासोबत आई किंवा मावशी नव्हती. एकेदिवशी शाळेच्या कॅटिंनमध्ये मला असे जाणवले की, माझ्या युनिफॉर्मला रक्ताचा डाग लागलेला आहे. मी कपडे बदलण्यासाठी लगेचच पळत सुटले. मी आज स्वत:ला खरोखरच नशीबवान समजते की, तो डाग केवळ मी एकटीनेच बघितला. कारण गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात दक्षिण भारतातील एका शाळेमधील शिक्षकाने बारा वर्षीय विद्यार्थिनीला तिच्या कपड्यांना लागलेल्या डागामुळे तिला शाळेतून हाकलून दिले होते. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने घराच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली होती.  पुढे बोलताना ट्विंकलने म्हटले की, ही एक सामान्य शारीरिक क्रिया आहे, मग अशात एखाद्या मुलीला हिनविणे कितपत योग्य आहे. मला अपेक्षा आहे की, ‘पॅडमॅन’च्या रिलीजनंतर मुलींमध्ये याविषयी जागरूकता निर्माण होईल. त्याचबरोबर त्यांच्यात या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी हिम्मत येईल. दरम्यान, ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथंम यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी ग्रामीण दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त: सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे काम केले. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे.