ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया (Tiku Talsania) यांना काल ब्रेन स्ट्रोक आला होता. सुरुवातीला त्यांना हृयदविकाराचा झटका आल्याची बातमी काल सगळीकडे पसरली होती. मात्र काही तासांनंतर त्यांची पत्नी दीप्ती तलसानिया यांनी स्पष्टीकरण दिले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. टीकू तलसानिया यांचं वय ७० वर्षे आहे. दरम्यान अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashmi Desai) त्यांच्या तब्येतीविषयी अधिकची माहिती दिली आहे.
एनडीटीव्ही च्या रिपोर्टनुसार, दीप्ती तलसानिया म्हणाल्या, "त्यांना हृदयविकाराचा धक्का आलेला नाही. तप ब्रेन स्ट्रोक आला होता. ते एका सिनेमाच्या स्क्रीनिंगला गेले होते. रात्री ८ वाजताच्या त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं."
टीकू तलसानिया ज्या स्क्रीनिंगला गेले होते तिथे अभिनेत्री रश्मी देसाई सुद्धा होती. तिचा गुजराती सिनेमा 'मॉम तने नई समझय' चं स्क्रीनिंग होतं. यानंतरच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रश्मी देसाई म्हणाली,"स्क्रीनिंगवेळी मी त्यांना भेटले. त्यांनी तिथेच एका व्यक्तीला सांगितलं की त्यांना बरं वाटत नाही आणि खूप त्रास होतोय. लगेच त्यांना रुग्णालयात नेलं. मी त्यांना भेटल्यानंतर १५ मिनिटांतच हे सगळं घडलं. मी त्यांना भेटले तेव्हा ते स्वस्थ होते आणि आनंदीही होते. मी अजून त्यांच्या पत्नीशी बोलले नाही. पण मला विश्वास आहे ते लवकरच बरे होतील."
टीकू तलसानिया यांनी अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' मध्येही ते दिसले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी चाहते प्रार्थना करत आहेत.