बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा खूप गाजला. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या सिनेमाबाबत अनेकांनी पोस्ट करत त्यांची मतं मांडली होती. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनीही काश्मीर फाइल्स आणि विवेक अग्निहोत्रींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिग्मांशू यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला बकवास म्हटलं आहे.
तिग्मांशू यांनी 'रेड माइक' या युट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "असे चित्रपट बेकार असतात. कोण बघतं असे सिनेमे? असे चित्रपट चालतंही नाहीत. फक्त काश्मीर फाइल्स हा सिनेमा चालला होता. मला या सिनेमांबद्दल बोलायलाही आवडत नाही. हे सगळे सिनेमे बेकार आहेत." पुढे त्यांनी भारतीय दिग्दर्शक प्रपोगंडा चित्रपट बनवत आहेत, असं म्हणत नाराजी व्यक्त केली.
"दिग्दर्शक त्यांची राजकीय विचारधारा सिनेमातून मांडत आहेत. भारतात एका विशिष्ट राजकारणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने काही दिग्दर्शक प्रपोगंडा असलेले चित्रपट सध्या बनवत आहेत. हे भयानक आहे. पण, हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते बेकार आहेत. असे चित्रपट चुकीच्या उद्देशाना बनवले जातात. त्यांना त्यातून फक्त पैसा कमवायचा असतो," असंही तिग्मांशू म्हणाले.
दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मिर फाइल्स' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमात पल्लवी जोशी, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.