Join us  

The kashmir files: 'गुजरात फाईल्स' सिनेमासाठीही निर्माते तय्यार, पण पंतप्रधानांकडून हवंय हे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:23 PM

राष्ट्रीय चित्रपट विजेता पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी गुजरात फाईल्स चित्रपट बनविण्यास तयार असल्याचं ट्विट केलं होतं.

मुंबई - देशभरात गेल्या काही दिवसांपासून ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा प्रचंड गाजत आहे. अनेक ठिकाणी या सिनेमासाठी हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. तर काही ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करण्यावरून वाद निर्माण होत आहे. काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा प्रेरित आहे. मात्र, या चित्रपटावरुन दोन गट पडले असून काहींनी सिनेमाला भाजपचा प्रफोगांडा असल्याचं म्हटलं. तर, दिग्दर्शक विनोद कापरी यांनी गुजरात फाईल्स सिनेमा बनविण्याची तयारीही दर्शवली आहे.  

राष्ट्रीय चित्रपट विजेता पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी गुजरात फाईल्स चित्रपट बनविण्यास तयार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर, त्यांनी आणखी एक ट्विट करत काही निर्माते या सिनेमाच्या निर्मित्तीसाठी तयार असल्याचंही सांगितलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांना केवळ एक आश्वासन हवे आहे. पंतप्रधान आज ज्यापद्धतीने भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बात करत आहेत. तोच विश्वास त्यांनी गुजरात फाईल्स या चित्रपटावेळीही द्यावा, असे ट्विट विनोद कापरी यांनी केलंय.  

द काश्मीर फाईल्सने जमवला गल्ला

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा नुकताच रिलीज झालेला 'द काश्मीर फाइल्स' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने केवळ चार दिवसांत 43.5 कोटींचा गल्ला जमवला. शाहीद कपूरचा ब्लॉकबस्टर 'कबीर सिंग', अक्षय कुमारचा 'रुस्तम', अजय देवगणचा 'शिवाय' आणि शाहरुख खानच्या 'रा वन'ला या सिनेमालाही याने मागे टाकलं आहे. दरम्यान, अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती-चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शन "द काश्मीर फाईल्स" ला आपला पाठिंबा दर्शविला आहे, ज्याने 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची वेदनादायक कथा उलगडली आहे.

द काश्मीर फाईल्स बद्दल काय म्हणाले मोदी

देशातील बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files) सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(PM Narendra Modi) या सिनेमावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.

टॅग्स :जम्मू-काश्मीरगुजरातनरेंद्र मोदी