Join us  

लॉकडाऊन इफेक्ट : आजारी लेकीसाठी अन् टीचभर पोटासाठी अभिनेत्री पावला स्यामला यांनी विकले पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 8:20 PM

पावला स्यामला यांनी सुमारे 250 सिनेमांत काम केले. अनेक पुरस्कारांवर नाव कोरले, पण आज हेच मानाचे पुरस्कार विकण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर ओढवली आहे.

ठळक मुद्देपावला यांच्या मुलीच्या पायाला जखम झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती अंथरुणाला खिळलेली आहे. त्यातच तिला टीबीही आहे.

कोरोनाने एकीकडे जवळच्या व्यक्तिंना हिरावून घेतले, दुसरीकडे अनेकांवर उपासमारीची वेळ आणली.  मनोरंजन विश्वही त्याला अपवाद नाही. कोरोनाने मनोरंजन विश्वात काम करणा-या अनेकांच्या हातचे काम हिरावून घेतले. तांत्रिक कामगारांसोबतच ज्येष्ठ कलाकारांना याचा सर्वाधिक फटका बसला.  अभिनेत्री पावला स्यामला (Pavala Syamala) यापैकीच एक. दक्षिण भारतीय सिनेमातल्या लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री पावला यांच्यावर कोरोनाने चक्क पुरस्कार विकण्याची वेळ आणली. हाताला काम नाही, त्यात लेक अंथरूणाला खिळलेली, त्यामुळे पावला यांना त्यांचे पुरस्कार विकावे लागले. आता सोशल मीडियावर अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.पावला यांनी सुमारे 250 सिनेमांत काम केले.  नेनु लोकल, माथु वाडालारा अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या कामाचे कौतुक झाले. अनेक पुरस्कारांवर त्यांनी नाव कोरले, पण आज हेच मानाचे पुरस्कार विकण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने घरखर्चासाठी त्यांना पुरस्कार विकावे लागले.

लेक अंथरूणावर...पावला यांच्या मुलीच्या पायाला जखम झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती अंथरुणाला खिळलेली आहे. त्यातच तिला टीबीही आहे. त्यामुळे महिन्याला तिच्या उपचारांसाठीच 10 हजार रुपये खर्च येतो, अशा स्थितीत पावला यांच्यावर जगण्यामरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

 इतकी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवतेय...एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पावला यांनी आपबीती सांगितली. त्या म्हणाल्या, आयुष्यात मी गरिबी पाहिली नाही असे नाही. गरिबीचे चटकेही सोसलेत. पण इतकी बिकट स्थिती पहिल्यांदा अनुभवतेय. पोरगी आजारी आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कोणी मदतीसाठीही पुढे येत नाही. तेलंगण सरकारकडून वृद्धांना दिले जाणारे पेन्शन गेल्या काही महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे रोजचा खर्च भागवणं कठीण झाले होते. अखेर मी अनेक पुरस्कार विकून टाकले.  पावला यांची स्थिती कळल्यावर आता अनेकांनी त्यांना मदत केली आहे. गेल्या आठवड्यात कॉमेडियन कल्याणीने त्यांना 10 हजार रुपयांची मदत केली. तसेच सुपरस्टार पवन कल्याण, चिरंजीवी हेदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत.  

टॅग्स :Tollywood