Join us  

​या दिग्गज अभिनेत्रीचे केवळ चौथीपर्यंत झाले होते शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 11:14 AM

निरूपा रॉय यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात गुजराती चित्रपटांतून केली. ...

निरूपा रॉय यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात गुजराती चित्रपटांतून केली. त्यानंतर त्यांनी अमर राज या चित्रपटात काम केले. दो बिघा जमीन या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा देखील लोकांमध्ये तशीच बनली होती. अनेकवेळा तर त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक त्यांच्या घरी येत असत. निरूपा रॉय अनेक चित्रपटात आईच्या भूमिकेत दिसल्या. अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेत तर प्रेक्षकांना त्यांना अनेक चित्रपटात पाहायला मिळाले आहे. मेरे पास माँ हे हा दीवार चित्रपटातील शशी कपूर यांचा संवाद प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अमिताभ आणि शशी कपूर यांच्या आईची भूमिका निरूपा रॉय यांनीच साकारली होती. निरूपा रॉय यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म गुजरातमधील वलसाड येथे झाला होता. त्यांचे कुटुंब हे मध्यमवर्गीय होते. प्रसिद्ध अभिनेत्री शामा ही त्यांची खूपच जवळची मैत्रीण होती. त्यांच्या या मैत्रिणीमुळेच त्यांना इंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण निरूपा रॉय यांचे शिक्षण केवळ चौथी पर्यंत झालेले होते. त्यांचे लग्न देखील खूपच कमी वयात झाले होते. अवघ्या १५ व्या वर्षी त्या कमल रॉय यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. निरूपा रॉय यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना फिल्मफेअरकडून २००४ ला लाइफ टाइम अॅचिव्हमेंट अॅवॉर्ड देण्यात आला होता तर त्यांना मुनीमजी, शहनाई आणि छाया या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. निरूपा रॉय यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडने त्यांना पैसा, प्रसिद्धी प्रचंड मिळवून दिली. २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले असून सध्या या दोन मुलांमध्ये त्यांच्या घरावरून सध्या वाद सुरू आहे. त्यांचे हे घर जवळजवळ १०० कोटींचे आहे.