Join us  

या गोष्टीचा सुशांतला बसला होता जबर धक्का, शेखर कपूर यांनी पोलिसांकडे केले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:16 PM

शेखर कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला असून त्यांनी यात बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला वीस दिवसांहून जास्त दिवस उलटून गेले आहेत. आता या प्रकरणी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे दिली आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस शेखर कपूर यांची चौकशी करणार होते, पण ते उत्तराखंडमध्ये आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामी त्यांनी ईमेलच्या माध्यमातून शेखर कपूर यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार शेखर कपूर यांनी सुशांत सिंग राजपूत आणि 'पानी' चित्रपटादरम्यानची त्याची वर्तणूकीबाबत माहिती दिली. 'पानी' सिनेमा बंद होणार असल्याचे कळताच सुशांत खूप कोलमडून गेला होता आणि त्याला रडू कोसळ्याचे शेखर कपूर यांनी त्यांच्या जबाबात सांगितले आहे.

शेखर कपूर म्हणाले की, 'पानी' हा सिनेमा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. 10 वर्षांपासून ते यावर काम करत होते. पण सुशांतच्या जाण्याने कदाचित त्याची जागा कुणी घेऊ शकणार नाही. हा चित्रपट बंद झाल्याने सुशांत नैराश्यात गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 2012-13 मध्ये 150 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटासंदर्भात त्यांची यशराज फिल्मच्या आदित्य चोपडा यांच्याशी भेट झाली होती. 2014 मध्ये निश्चित झाले की यशराज बॅनरखाली हा चित्रपट होणार होता.

या चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान शेखर कपूर आणि सुशांतची भेट झाल्याचे ते म्हणाले. 3-4 वर्षात हा चित्रपट पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. यशराजने प्री-प्रोडक्शनसाठी 7-8 कोटी खर्च केल्याचेही ते म्हणाले. सुशांतच्या तारखाही ब्लॉक करण्यात आल्या होत्या. यामध्ये 'गोरा' नावाची भूमिका सुशांत साकारणार होता. ज्यामध्ये त्याने स्वत:ला झोकून घेतले होते.

शेखर कपूर यांनी पुढे सांगितले की, वर्कशॉपवेळी अभिनय कौशल्यामध्ये त्याची जिद्द आणि यासाठी वेडेपणा दिसून यायचा. सुशांतने पानी चित्रपटासाठी अनेक इतर प्रोजेक्ट सोडले होते. चित्रपटाच्या बैठकांदरम्यान तो उपस्थित राहत असे आणि बारीक बारीक गोष्टी जाणून घेत असे.

शेखर कपूर सुशांतविषयी बोलताना म्हणाले की ते खूप लवकर चांगले मित्र झाले होते. आम्ही भौतिकशास्त्राबद्दल गप्पा मारत असू, असेही ते म्हणाले. त्यावेळी चित्रपटाच्या कंटेंटबाबत आदित्य चोपडा आणि शेखर कपूर यांच्यामध्ये मतभेत निर्माण झाले. आदित्य चोपडा यांचे विचार वेगळे होते, त्यामुळे हा चित्रपट यशराज बॅनरपासून वेगळा झाला आणि चित्रपट होणार नाही हे निश्चित झाल्याचे शेखर कपूर म्हणाले.

याबाबत सुशांतच्या प्रतिक्रियेबाबत शेखर कपूर म्हणाले की, 'चित्रपट बनणार नाही हे सुशांतला कळताच तो पूर्णपणे कोलमडला. तो माझ्यापेक्षा जास्त या चित्रपटामध्ये बुडाला होता. त्यादिवशी संध्याकाळी तो माझ्याकडे आला आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडला. त्याला रडताना पाहून मी देखील कोलमडलो आणि मलाही रडू कोसळले. चित्रपट बंद होण्याचा त्याला खूप मोठा धक्का बसला होता, ज्यामुळे तो नैराश्यात गेला. मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला समजावले की ही भूमिका तो नक्की मोठ्या पडद्यावर जगेल. निराश होण्याची गरज नाही फक्त थोडी वाट बघ'.

शेखर कपूर पुढे म्हणाले की, यानंतर त्यांनी अनेक प्रोडक्शन हाऊसशी या चित्रपटाबाबत संपर्क साधला होता. पण कुणीही सुशांतला घेऊन चित्रपट करण्यास तयार झाले नाही. त्यांना एखाद्या 'एस्टाब्लिश्ड अभिनेत्या'ची गरज होती. सुशांतला घेऊन त्यांना जोखीम उचलायची नव्हती. यामुळे सुशांत नैराश्यात गेला. शेखर कपूर म्हणाले की, त्यांनी सुशांतबरोबर दुसरी एखादी फिल्म करण्याचा विचार केला होता, पण ती बाब प्रत्यक्षात उतरली नाही. त्यानंतर शेखर कपूर लंडनला गेल्याने त्यांचे सुशांतशी बोलणे न झाल्याचे त्यांनी सांगितले.काही कालावधीने सुशांतने त्यांना सांगितले होते की त्याने यशराजबरोबर कॉन्ट्रॅक्ट तोडले आहे. त्याने शेखर कपूर यांना हे देखील सांगितले होते की, इंडस्ट्रीमध्ये त्याच्याबरोबर सावत्र वागणूक होत आहे. सुनियोजित पद्धतीने त्याच्याकडून चांगले चित्रपट काढून घेतले जात आहेत. गेल्या 6-7 महिन्यांपासून त्याच्याबरोबर कोणताही संपर्क नसल्याचे ते म्हणाले. शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे जबाब नोंदवला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांना संपर्क करून स्पष्ट कळवले आहे की पोलीस त्यांची चौकशी करू इच्छितात आणि त्याकरता त्यांनी मुंबई गाठून वांद्रे पोलीस ठाण्यात यावे. ही चौकशी कधी होणार हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतशेखर कपूर