Join us  

 खुदा हाफिज मुंबई... म्हणत सुशांतची हिरोईन संजनाने कायमची सोडली स्वप्ननगरी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 11:38 AM

इन्स्टाग्राम पोस्टमधून दिले संकेत

ठळक मुद्देसुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी संजनाचीही चौकशी केली होती. तब्बल 9 तास चाललेल्या या चौकशीत संजनाने काही खुलासेही केले होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण हो, या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अस्वस्थता या ना त्या रूपात समोर येतेय. सुशांतची हिरोईन संजना सांघी हिने कदाचित याच कारणाने मुंबईचा कायमचा निरोप घेतला आहे. सुशांतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ यात संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होतोय. सुशांतचा हा शेवटचा तर संजनाचा लीड अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा. मात्र सुशांतच्या आत्महत्येनंतर हा सिनेमा रिलीज होण्याआधीच संजनाने मुंबई सोडली. एका पोस्टमधून तिने याबद्दलचे संकेत दिले.

विमानतळावरील स्वत:चा सेल्फी शेअर करत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘खुदा हाफिज, मुंबई. 4 महिन्यानंतर तुझे दर्शन झाले. आता मी चालले दिल्लीला परत. तुझे रस्ते काहीसे वेगळे वाटले, सुनसान होते. कदाचित माझ्या हृदयातील दु:ख, माझा दृष्टिकोन बदलत आहे  किंवा तू सुद्धा सुद्धा दु:खात आहेस. भेटूया? लवकरच, किंवा कदाचित कधीच नाही,’ असे संजनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी संजनाचीही चौकशी केली होती. तब्बल 9 तास चाललेल्या या चौकशीत संजनाने काही खुलासेही केले होते. ‘दिल बेचारा’च्या सेटवर सुशांत व संजनामध्ये वाद झाला होता, अशा बातम्या मध्यंतरी होत्या. संजनाने या सगळ्या अफवा असल्याचे पोलिस चौकशीत सांगितले होते. आमच्यात काहीही वाद नव्हता. त्या सगळ्या अफवा होत्या, असे तिने सांगितले होते. मात्र एक खरे की, सुशांतचे अचानक जाणे कदाचित संजनाच्याही जिव्हारी लागले असावे. तिच्या पोस्टमधून तरी हेच दिसतेय.

 

संजनाने 2011 साली ‘रॉकस्टार’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात रणबीर कपूर व नरगिस फाखरी मुख्य भूमिकेत होते. संजना यात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. त्याआधी अनेक जाहिरातींमध्ये संजना झळकली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत