Join us  

सुशांत सिंग राजपूत-एकता कपूरचा ‘पवित्र रिश्ता’; म्हणे एकता जे सांगेल ते मी करेल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 6:00 AM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत एकेकाळी टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. ‘किस देश मे है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने.

ठळक मुद्दे लवकरच ‘छिछोरे’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत एकेकाळी टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. ‘किस देश मे है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने. २००९ मध्ये आलेल्या या मालिकेत सुशांतने मानव देशमुखची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर घेतली की, हा शो सुशांतच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. या शोने दिलेल्या लोकप्रियतेच्या बळावरच सुशांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. त्यामुळे सुशांत आजही एकता कपूरचा प्रचंड आदर करतो. इतका की, एकता जे म्हणेल ते मी करेल, असे सुशांत म्हणतो.

  एकतासोबत टीव्हीवर पुन्हा काम करणार का? असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत सुशांतला विचारण्यात आला. यावर क्षणभरही विचार न करता सुशांतने बोलता झाला. ‘टीव्हीवरच का? एकता कपूर ज्या व्यासपीठावर म्हणतील, तिथे मी काम करण्यास तयार आहे. माझ्या कुटुंबानंतर एकता कपूर यांनीच माझ्या करिअरमध्ये मला सर्वाधिक मदत केली आहे. त्या जे सांगतील, ते मी करेल,’ असे सुशांत म्हणाला.

सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडचा एक उत्तम अभिनेता आहे. ‘एमएस धोनी’, ‘राबता’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि अलीकडे प्रदर्शित झालेला ‘सोनचिडिया’अशा अनेक चित्रपटांतील  सुशांतचा अभिनय प्रेक्षकांना भावला. लवकरच ‘छिछोरे’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सुशांतचा ‘दिल बेचारा’हा चित्रपट यावर्षी २९ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात संजना सांघी त्याच्या अपोझिट दिसणार आहे. तत्पूर्वी येत्या आॅगस्टमध्ये त्याचा ‘छिछोरे’ रिलीज होतोय. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा व सुशांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतएकता कपूर