Join us  

शेतकरी आंदोलनावर ट्वीट करून पुरता फसला सुनील शेट्टी, मुलांना मिळतेय धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 10:49 AM

‘मी एक अभिनेता आहे. काहीही बोललो तरी मी ट्रोल होतो. मग मी बोलावे की नाही?’

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावर हॉलिवूड पॉप सिंगर रिहाना व अन्य इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर सुनील शेट्टीने या सेलिब्रिटींना फटकारत सरकारच्या बाजूने ट्वीट केले होते.

भारतातील शेतकरी आंदोलनाला रिहाना, मिया खलीफा, ग्रेटा थनबर्ग आदी इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी पाठींबा दिल्यानंतर केंद्र सरकारने ‘इंडिया टुगेदर’ ही मोहिम सुरु केली. अनेक भारतीय सेलिब्रिटींनी सरकारची ही मोहिम उचलून धरली.   फिल्म इंडस्ट्रीतून सरकारच्या बाजूने सर्वप्रथम मैदानात उतरला तो बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थात सुनील शेट्टी. त्याने सरकारला पाठींबा देत ट्वीट  केले. मात्र हे ट्वीट करताच लोकांनी सुनील शेट्टीला ट्रोल करणे सुरु केले. त्याला शेतकरीविरोधी ठरवले. अगदी त्याच्या मुलांना ट्वीटरवर धमक्याही दिल्यात.

आता सुनील शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तो यावर व्यक्त झाला. मी शेतकरीविरोधी आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ बकवास असल्याचे तो म्हणाला. ‘एका ट्वीट मुळे लोकांनी मला शेतकरीविरोधी ठरवले, याचे मला दु:ख आहे. माझ्या आवाक्यात असते तर असे म्हणणा-या प्रत्येकाला मी पकडले असते. शेतक-यांसोबत माझ्या भावना जोडलेल्या आहेत. माझे पूर्वज शेतकरी होते. मी एका छोट्याशा गावातून आलेला व्यक्ती आहे. आजही दरवर्षी चारवेळा मी माझ्या गावात जातो. मी कोणत्याही राजकीय पार्टीशी संबंधित नाही. मला जे वाटले तेच फक्त मी बोललो. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सौहार्दपणे निकाली काढा, इतकेच मी सुद्धा म्हणालो. पण यावरूनही मला ट्रोल केले जातेय,’ असे सुनील शेट्टी म्हणाला.

‘मी एक अभिनेता आहे. मी काहीही बोललो तरी मी ट्रोल होतो. मग मी बोलावे की नाही? माझ्यामुळे माझ्या मुलांना सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात आहे. का? मी काय चूक केली? ’, असे सवालही त्याने यावेळी केले.

का ट्रोल होतोय सुनील शेट्टी?

शेतकरी आंदोलनावर हॉलिवूड पॉप सिंगर रिहाना व अन्य इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर सुनील शेट्टीने या सेलिब्रिटींना फटकारत सरकारच्या बाजूने ट्वीट केले होते. ‘प्रत्येक गोष्टीबद्दल कायम व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. कारण अर्धसत्यापेक्षा घातक दुसरे काहीही नाही,’ असे ट्वीट  त्याने केले होते. त्याच्या या ट्वीट नंतर लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरू केले होते.

टॅग्स :सुनील शेट्टीशेतकरी आंदोलन