Join us  

“द स्टोलन प्रिन्सेस”अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 1:17 PM

या फिल्मचा मुख्य विषय चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय हा असून, त्यामध्ये एक मोहक प्रेमकथा गुंफलेली आहे.

“द स्टोलन प्रिन्सेस” प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या साहसांनी भरलेली एक आकर्षक परीकथा, विस्मय वाटावा अशा अस्सल व्यक्तिरेखा आणि रोचक उपकथानकाने भरलेला हा एक कुटुंबप्रधान अॅनिमेशनपट आहे. या फिल्मचा मुख्य विषय चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय हा असून, त्यामध्ये एक मोहक प्रेमकथा गुंफलेली आहे. लहान मुले, टीनएजर्स आणि तरुण या सर्वांना आवडले  अशा पद्धतीने ही अॅनिेमेशन फिल्म तयार करण्यात आली आहे. कथेचे बहुअंगी स्वरूप आणि भुरळ घालणारी दृश्ये यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी ही फिल्म रोचक ठरेल. या अॅनिमेशनपटाचे सादरीकरण आणि वितरण अल्ट्रा मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेंट समूहाने केले आहे.

ओलेग मालामुझ यांनी दिग्दर्शित केलेल्या या अॅनिमेशनपटाची अप्रतिम कथा घडते ती शूर सैनिक, सुंदर राजकन्या आणि एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या चेटक्यांच्या युगात. सैनिक होण्याचे स्वप्न बाळगलेला रुसलान नावाचा एक भटक्या कलावंत देखण्या मिलाला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. ती राजाची कन्या आहे अशी शंकाही त्याच्या मनात येत नाही.  अर्थात, या प्रेमिकांचा आनंद फार काळ टिकणार नसतो. चोर्नोमोर नावाचा एक दुष्ट जादूगार एका मायावी वावटळीच्या रूपाने येतो आणि मिलाची प्रेम करण्याची शक्ती आपल्या जादूटोण्याच्या शक्तीमध्ये रूपांतरित करण्यासाठी तिला रुसलानच्या डोळ्यासमोरून चोरून नेतो. रुसलान अजिबात वेळ न घालवता चोरीला गेलेल्या राजकन्येचा शोध घेणे सुरू करतो, सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि खरे प्रेम हे जादूटोण्याहून बलशाली आहे हे सिद्ध करण्यासाठी.