Join us  

जन्माच्या 16 दिवसानंतर हरवले वडिलांचे छत्र, भावूक करेल हिमेश रेशमियाच्या हिरोईनची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 8:00 AM

कोण आहे हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी अ‍ॅण्ड हीर’ या सिनेमाची हिरोईन?

ठळक मुद्दे2012 मध्ये ‘हाइड अ‍ॅण्ड सीक’ या मल्याळम चित्रपटातून तिने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली.

बॉलिवूडच्या मल्टिटॅलेंटेड व्यक्तिंपैकी एक असलेला हिमेश रेशमिया सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हिमेशचा ‘हॅपी हार्डी अ‍ॅण्ड हीर’  हा सिनेमा येत्या 31 जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात हिमेश अभिनेत्री सोनिया मान हिच्यासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. सोनिया मान ही तशी ब-याच कालावधीपासून इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. मात्र ‘हॅपी हार्डी अ‍ॅण्ड हीर’  हा सिनेमा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट मानला जातोय. या चित्रपटात सोनियाची अदाकारी प्रेक्षकांना किती भावते, हे  चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. तूर्तास सोनियाबद्दलच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सोनिया मानचा जन्म 10 सप्टेंबर 1990 रोजी उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये झाला. सोनियाचे वडील बलदेव सिंग मान हे डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते व लेखक होते. सोनियाच्या जन्मानंतर 16 दिवसांनी म्हणजे 26 सप्टेंबरला दहशतवाद्यांनी तिच्या पित्याची अमृतसरमध्ये हत्या  केली. 

बलदेवसिंग आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी गावाला जात असतानाच त्यांची हत्या झाली होती. मुलीचा चेहरा न पाहताच बलदेव सिंग यांनी जगाचा निरोप घेतला आणि सोनिया कायमची पोरकी झाली.  काळीज पिळवून टाकणारी गोष्ट म्हणजे, मृत्यूपूर्वी बलदेव सिंग आपल्या मुलीच्या नावे एक पत्र सोडून गेले होते. या पत्रात मुलीच्या भविष्याची अनेक स्वप्न त्यांनी रंगवली होती.

वडिलांचे छत्र गमावल्यानंतर एकट्या आईने सोनियाला लहानाचे मोठे केले. अमृतसरमधून सोनियाने आपले शिक्षण पूर्ण केले आणि पुढे अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला काही म्युझिक व्हिडीओमध्ये ती झळकली.

2012 मध्ये ‘हाइड अ‍ॅण्ड सीक’ या मल्याळम चित्रपटातून तिने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. 2013 मध्ये पंजाबी सिनेमात ती झळकली.  2014 मध्ये ‘कहीं है मेरा प्यार’ या हिंदी सिनेमात तिला संधी मिळाली. अर्थात हा चित्रपट फ्लॉप झाला.

आता सोनिया हिमेश रेशमियाच्या अपोझिट ‘हॅपी हार्डी अ‍ॅण्ड हीर’या सिनेमात दिसणार आहे. निश्चितपणे हा तिच्या करिअरमधील मोठा सिनेमा आहे.

टॅग्स :हिमेश रेशमिया