Join us  

लॉकडाऊनमुळे ‘ड्रिम गर्ल’च्या अभिनेत्यावर आली रस्त्यावर फळं विकण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:47 PM

मालिका व चित्रपटाचे शूटींग थांबले. अशात पोटापाण्यासाठी त्याला दिल्लीच्या रस्त्यावर फळांचा ठेला लावावा लागला.

ठळक मुद्देसोलंकी हा विवाहित आहे. दोन मुलांचा बाप आहे. गेल्या  25 वर्षांपासून तो दिल्लीत वास्तव्यास आहे.

कोराना व्हायरसने अनेकांना फटका बसलाय. लॉकडाऊनमुळे हजारो हातांना काम नाही. हाताला काम नसल्याने या सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. इंडस्ट्रीतील अनेक लहान-मोठे कलाकार, कामगारांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतोय. एका अभिनेत्यावर तर रस्त्यावर उभे राहून फळं विकण्याची वेळ आली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे सोलंकी दिवाकर.अलीकडे प्रदर्शित झालेल्या आयुष्यमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ या सिनेमात सोलंकी दिवाकर एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता. त्याआधी ‘सोनचिडीया’ या सिनेमातही त्याने काम केले होते. याशिवाय तितली, हल्का या सिनेमातही तो झळकला होता. हाच अभिनेता आता दिल्लीतच्या रस्त्यावर फळं विकतोय.

सोलंकीला नावाने फार लोक ओळखत नसले तरी त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे़.  सोलंकी गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. पण लॉकडाऊनमुळे सगळे ठप्प झाले. मालिका व चित्रपटाचे शूटींग थांबले. अशात पोटापाण्यासाठी सोलंकीला दिल्लीच्या रस्त्यावर फळांचा ठेला लावावा लागला.

  एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत सोलंकीने सांगितले, ‘लॉकडाऊमुळे सगळे काही ठप्प आहे. पण रोजचा खर्च थांबणारा नाही. घराचे भाडे थकलेय, ते द्यायलाच हवे. कुटुंबाचे व माझे पोट भरायलाच हवे. म्हणून मी आता फळं विकायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. मी ऋषी कपूर यांच्या एका सिनेमात छोटीशी भूमिका साकारत होतो. पण आता काम बंद आहे आणि ऋषी कपूर यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. सोलंकी हा विवाहित आहे. दोन मुलांचा बाप आहे. गेल्या  25 वर्षांपासून तो दिल्लीत वास्तव्यास आहे. कुठलेही काम लहान-मोठे नाही़ पण हो, यापुढे अभिनय करू शकलो नाही तर वाईट वाटेल. आयुष्यभरासाठी एक खंत मनात राहील, असेही सोलंकीने सांगितले.

टॅग्स :आयुषमान खुराणाड्रिम गर्ल