Join us

शो मस्ट गो आॅन - श्रेयस तळपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 15:41 IST

​दिग्दर्शक, कलाकार आणि पत्नीच्या आजारपणात एक चांगला पती या सर्व जबाबदाºयांचा जेव्हा एकाच वेळी सामना करावा लागतो तेव्हा मानसिक आणि भावनिक स्थिती काय असू शकते याचा अनुभव घेताना मला बºयाचशा गोष्टी शिकावयास मिळाल्या.

सतीश डोंगरेदिग्दर्शक, कलाकार आणि पत्नीच्या आजारपणात एक चांगला पती या सर्व जबाबदाºयांचा जेव्हा एकाच वेळी सामना करावा लागतो तेव्हा मानसिक आणि भावनिक स्थिती काय असू शकते याचा अनुभव घेताना मला बºयाचशा गोष्टी शिकावयास मिळाल्या. खरं तर प्रत्येक कलाकाराला ‘शो मस्ट गो आॅन’ याप्रमाणेच आयुष्य जगावे लागते. व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा ताळमेळ साधताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे याचा निर्णय वेळेनिरूप घ्यावा लागतो. अर्थात ही सर्व मानसिक आणि भावनिक कसरत असल्याने कलाकाराचे आयुष्य म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही, असे मत अभिनेता तथा दिग्दर्शक श्रेयस तळपदे याने व्यक्त केले. त्याच्या आगामी चित्रपटांविषयी त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने अनेक प्रश्नाचे दिलखुलास उत्तरे दिली.प्रश्न : अभिनेता म्हणून छाप पाडल्यानंतर दिग्दर्शन क्षेत्रातही तू उडी घेतली आहेस, कोणत्या आव्हानांचा तुला सामना करावा लागला?- खरं तर दिग्दर्शक म्हणून आव्हानांचा सामना करताना मला जे काही शिकायला मिळाले ती गोष्टी माझ्यादृष्टीने महत्त्वाची आहे, असे मी समजतो. वास्तविक ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटासाठी आम्ही दिग्दर्शकांचा शोध घेत होतो. जेव्हा मी चित्रपटाची कथा अभिनेता सनी देओल यांना ऐकविली, तेव्हा त्यांनी मला दिग्दर्शक होण्याचा सल्ला दिला. अर्थात हा सल्ला मला धाडसीपणाचा वाटला. परंतु प्रत्यक्ष जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा सर्व गोष्टी जुळत गेल्या. एक दिग्दर्शक म्हणून काम करताना मला बरेचसे बारकावे समजले. त्यात एक गोष्ट मी शिकलो, ती म्हणजे आता मी कोणाच्याच कामाबद्दल जजमेंटल नाही. एक कलाकार म्हणून मी कामात त्रुटी शोधायचो; परंतु आता मी त्या निर्णयापर्यंत पोहचत नाही. प्रश्न : सनी देओलचाही प्रवास अभिनेता ते दिग्दर्शक असा आहे, अशात तुला त्याच्याकडून काही टीप्स मिळाल्या काय?- होय, सनी देओलचे इंडस्ट्रीमध्ये मोठे योगदान आहे. अशात त्याच्यासोबत काम करणे माझ्यासाठी जबाबदारी वाढविणारे होते. जेव्हा मी सनीपाजीला स्क्रीप्ट ऐकविली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी मराठी ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटापासून या प्रोजेक्टमध्ये गुंतलेला आहे. अशात त्याने मला हे सर्व पडद्यावर उतरविण्यासाठीच तूच का प्रयत्न करीत नाहीस? असा प्रश्न केला. सनीपाजीचे हे बोल आत्मविश्वास वाढविणारे होते. कारण ऐवढा मोठा कलाकार जेव्हा असा सल्ला देतो, तेव्हा ती खूप मोठी टीप्स असते असे मी समजतो. तसेच रोहित शेट्टी, श्याम बाबू, फराह खान या दिग्गजांबरोबर काम करताना ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याचाही फायदा मला दिग्दर्शनात झाला. प्रश्न : तुफान अ‍ॅक्शनसाठी ओळखल्या जाणाºया सनी देओलला कॉमेडीपटात निवडण्यामागे काही विशेष कारण?- मुळात चित्रपटाचा विषय नसबंदीचा असल्याने यामध्ये एखादी ही-मॅनची भूमिका असावी, असे मला वाटत होते. मराठीमध्येही जेव्हा आम्ही दिलीप प्रभावळकर यांची निवड केली होती, तेव्हा प्रेक्षकांना नसबंदीसारखा विषय असताना यात नक्कीच थ्रिलरपणा नसावा असा संदेश गेला होता. हाच निकष येथेही लागू होतो. कारण सनी देओलचा इंडस्ट्रीमधील प्रवास पाहता, त्याच्या भूमिका चोखंदळ राहिल्या आहेत. अशात तो नसबंदीसारखा विषयही तेवढ्याच गंभीरतेने अन् मजेशीरपणे पडद्यावर मांडेल, असा प्रेक्षकांना विश्वास आहे. प्रश्न : ‘गोलमाल अगेन’च्या शूटिंगला वेळ देणे तुला अवघड व्हायचे; अशात तुला फोन करून बोलवावे लागायचे, काय सांगशील?- होय, मला रोहित शेट्टीचा फोन यायचा. तो मला म्हणायचा, ‘सर आपका शॉट रेडी हैं’ अर्थात हे सर्व गमतीत असायचे. कारण जेव्हा मी गोलमालच्या सेटवर असायचो तेव्हा मी ‘पोस्टर बॉइज’च्या सेटवर काय चालले असेल याचा आढावा घेण्यासाठी सतत फोनवर बोलत असायचो. त्यामुळे रोहितला वाटायचे की, हा असा आपल्याला भेटत नाही म्हणून तो मला फोन करूनच बोलवायचा. अर्थात हे सगळं काही गमतीजमतीचा भाग होता. असो, पण रोहितने मला खूप सांभाळून घेतले. मी पोस्टर बॉइजवर काम करीत असल्याचे त्याला माहीत असल्याने त्याने मला शूटिंगसाठी पुरेसा वेळ दिला. प्रश्न : पोस्टर बॉइज आणि गोलमाल अगेनमध्ये व्यस्त असतानाच तुझी पत्नी दीप्तीला स्वाइन फ्लूची लागण झाली होती, काम आणि परिवार हा ताळमेळ बांधणे किती अवघड होते?- हा काळ माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होता. परंतु म्हणतात ना ‘शो मस्ट गो आॅन’ त्यानुसार सगळं काही घडत गेलं. जेव्हा दीप्तीला मी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिनेच मला सांगितले की, ‘डॉक्टर माझी काळजी घेतील, तू तुझ्या कामाचं बघ’ दीप्तीचे हे शब्द मला दिलासा देणारे होते. कारण तिला माहीत होते की, तीनशे-साडेतीनशे लोकांचा स्टाप सेटवर आहे, अशात तुमचे त्याठिकाणी जाणे किती महत्त्वाचे होते. त्यातच ती निर्माती असल्याने तिला याची जाणीव होती. परंतु एक कलाकार म्हणून परिवार आणि व्यावसायिक जीवन यांच्यात ताळमेळ बांधणे खूपच आव्हानात्मक असते. कलाकारांचे आयुष्य म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही.