चेन्नई - डॉक्युमेंट्री चित्रपट कालीच्या आक्षेपार्ह पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लीना मणिमेकलईच्या या चित्रपटातील पोस्टरमध्ये काली मातेला सिगारेट पिताना आणि एका हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दिसत होता. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा वाद एवढा वाढला की, कॅनडामध्ये भारतीय हाय कमिशनने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लीना मणिमेकलई वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अन्य डॉक्युमेंट्री चित्रपटांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. वादांमुळे चर्चेत आलेल्या लीना हिने वैयक्तिक जीवनामध्ये खूप संघर्ष पाहिला आहे. तिला समाजात, कुटुंबामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या संघर्षाचा सामना करावा लागला.
लीना मणिमेकलई मदुराईच्या दक्षिणेत असलेल्या महाराजपुरम गावातील रहिवासी आहे. त्यांच्या गावातील प्रथेनुसार मुलींचं लग्न हे त्यांच्या मामाशी केलं जातं. लीनाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ती घरातून चेन्नईला पळून गेली. तिथे तिने एका तामिळ मासिकाच्या ऑफीसमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. मात्र ऑफिसमधील लोकांनी तिला थांबायला सांगून तिची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. लीनाने कुटुंबीयांची कशीबशी समजूत काढली आणि इंजिनियरिंगचं शिक्षण घेणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर लीना वडिलांचे तामिळ डायरेक्टर पी भारथीराजा यांच्यावर लिहिलेले डॉक्टरल थीसीस प्रकाशित करण्यासाठी पुन्हा चेन्नईला गेली. तिथे भारथीराजा यांच्याकडे गेली असता पहिल्या नजरेतच ती त्यांच्या प्रेमात पडली. मात्र लीनाच्या आईला ही गोष्ट आवडली नाही. तिने उपोषण सुरू केलं, त्यानंतर ती सिनेमा आणि भारथीराजा यांना सोडून पुन्हा घरी आली. २००२ मध्ये तिने तिच्या मथाम्मा या पहिल्या चित्रपटावर काम सुरू केले. या दरम्यान, तिला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. तिने फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून पैसे जमवून ते चित्रपटांमध्ये गुंतवले. त्यामुळे एकवेळ तिच्याकडे घराचं भाडं भरण्यासाठीही पैसे नव्हते.
२००२ मध्ये लीनाने देवदासी प्रथेवर एक डॉक्युमेंट्री बनवली होती. त्या फिल्मचं नाव होतं मथाम्मा. यामध्ये तिने १०-२० रुपयांत लहान मुलींना मंदिरात समर्पित करण्याची आणि त्यांचं पूजारी-पंडितांकडून शोषण होण्याचं चित्रण केलं होतं. त्यावेळी समाजाकडून झालेला विरोध तिने झुगारून लावला होता. तर २००४ मध्ये तिने दलित महिलांवरीत अत्याचारावर आधारित पराई हा चित्रपट तयार केला होता. तर २०११ मध्ये धनुषकोढीच्या मच्छिमांरांवर सेंगादल ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. त्यावेळीही मोठा वाद झाला होता.