Join us  

शरदने 'तानाजी'च्या ट्रेलर लाँचच्यावेळी म्हटले, शिवाजी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:00 AM

तानाजीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी एका पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख शरद केळकरला खटकला. त्याने पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देशरदने लगेचच त्या पत्रकाराची चूक सुधारत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करायला सांगितला. शिवाजी महाराजांच्या प्रति शरदला असलेला आदर पाहाता सगळ्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला. एवढेच नव्हे तर शरदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अजय देवगण, सैफ अली खान यांचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 3 मिनिटे 21 सेकंंदाच्या या ट्रेलरमधील दमदार संवाद, कलाकारांचा अभिनय, भव्यदिव्य सेट, युद्धाचे प्रसंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. निष्ठावान मावळ्यांनी त्यांना भक्कम साथ दिली. याच मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तानाजी मालसुरे. मुलाचे लग्न बाजूला ठेवून शिवरायांच्या एका शब्दाखातर युद्धासाठी सज्ज झालेल्या तानाजींच्या रूपात मराठ्यांचा इतिहास या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला शरद केळकर या अभिनेत्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील त्याच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी उपस्थित असलेल्या मीडियाशी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने संवाद साधला. त्यावेळी शरदला या चित्रपटात तो साकारत असलेल्या भूमिकेविषयी विचारण्यात आले. त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेविषयी त्याला विचारताना एका पत्रकाराने महाराजांचा एकेरी उल्लेख केला. ही गोष्ट शरद केळकरला चांगलीच खटकली. त्याने लगेचच त्या पत्रकाराची चूक सुधारत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करायला सांगितला. शिवाजी महाराजांच्या प्रति शरदला असलेला आदर पाहाता सगळ्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला. एवढेच नव्हे तर शरदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. शरदच्या या कृत्यामुळे सगळीकडूनच त्याचे कौतुक केले जात आहे.

अजय देवगण या चित्रपटात तानाजींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :शरद केळकरतानाजी