Join us  

शम्मी कपूर यांचा मुलगा एकेकाळी स्वत: लोड करायचा ट्रक, म्हणून सोडले फिल्मी करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 1:32 PM

शम्मी कपूर यांच्याबद्दल आपण सगळेच जाणतो. पण त्यांचा मुलगा आदित्य राज कपूर याच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज आदित्य राजचा वाढदिवस.

ठळक मुद्दे०१० मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी ‘चेस’ या चित्रपटातून त्याने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला.

शम्मी कपूर आज आपल्यात नाहीत. सिनेमाचा एक काळ त्यांनी गाजवला. तुमसा नहीं देखा, दिल देके देखो, जंगली, कॉलेज गर्ल, प्रोफेसर, चायना टाऊन, कश्मीर की कली असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिलेत. शम्मी कपूर यांच्याबद्दल आपण सगळेच जाणतो. पण त्यांचा मुलगा आदित्य राज कपूर याच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज आदित्यराजचा वाढदिवस. १ जुलै १९५६ रोजी त्याचा जन्म झाला.

आदित्य राज हा शम्मी कपूर व गीता बाली यांचा मुलगा आहे. ‘जबसे तुम्हे देखा है’ या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. शिक्षण पूर्ण केल्यावर आदित्यने चित्रपटात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. १९७३ साली आलेल्या ‘बॉबी’ या चित्रपटात त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. यानंतर सत्यम शिवम सुंदरम, गिरफ्तार, साजन, दिल तेरा आशिक, पापी गुडिया आणि आरजू यासारख्या हिट चित्रपटांतही त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले. पण चित्रपटांत जम बसणार नाही, असे जाणवताच त्याने चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्याने पुन्हा एकदा वापसी केली. ‘डोन्ट स्टॉप ड्रीमिंग’ आणि ‘सांबर साल्सा’ सारखे चित्रपट त्याने बनवले. यानंतर २०१० मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी ‘चेस’ या चित्रपटातून त्याने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. यानंतर पॅरेंट्स, दिवानगी ने हद कर दी, इसी लाइफ में, से यस टू लव्ह, यमला पगला दीवाना 2 अशा चित्रपटांत लहानमोठ्या भूमिका केल्यात.

चित्रपटांत काम करण्याऐवजी आदित्यचा वेअर हाऊस व ट्रकचा बिझनेस आहे. आदित्यच्या कंस्ट्रक्शन कंपनीने मुंबईचा एम्युजमेंट पार्क आणि दिल्लीतील अप्पू घर बनवले आहे.

२०१४ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की, मी वयाच्या १६ व्या वर्षी फिल्मी करिअर सुरु केले होते. ३ वर्षे काम केल्यानंतर मला माझे गुरु भेटले आणि सगळे काही बदलले. त्याकाळात माझ्याकडे पैसे नव्हते. मी दुस-यांसाठी काम केले. थोडे पैसे जमल्यानंतर मी माझा बिझनेस सुरु केला. मी भाड्याने वेअर हाऊस व ट्रक घेतले. कधीकधी ट्रक लोड करण्यासाठीही पैसे नसत. मी स्वत: ट्रक लोड करायचो. शम्मी कपूरचा मुलगा ट्रक लोड करतोय, असे लोक म्हणायचे. पण मी आनंदी आहे. मी स्वत: स्वत:चे आयुष्य घडवले.  माझे वडिलही माझ्या कामामुळे आनंदी होते.

टॅग्स :शम्मी कपूर