Join us  

Death Anniversary: या अभिनेत्रीमुळे शम्मी कपूर यांनी हाती घेतला होता बिअरचा प्याला, हे होते कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:00 PM

देखणा चेहरा, भुरे डोळे, कपाळावर रूळणारे केस असा एक बॉलिवूडचा हँडसम हिरो म्हणजे, अभिनेते शम्मी कपूर. शम्मी कपूर आज आपल्यात नाहीत.

ठळक मुद्दे 1957 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटामुळे शम्मी यांना ख-या अर्थाने यश मिळाले.

देखणा चेहरा, भुरे डोळे, कपाळावर रूळणारे केस असा एक बॉलिवूडचा हँडसम हिरो म्हणजे, अभिनेते शम्मी कपूर.शम्मी कपूर आज आपल्यात नाहीत. 2011 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला शम्मी कपूर यांनी जगाला अलविदा केले होते. शम्मी कपूर यांनी केवळ आपल्या शानदार अभिनयामुळेच नाही तर आपल्या खास डान्सिंग स्टाईलनेही प्रेक्षकांची मने जिंकलीत.

  फ्री स्टाईल डान्स ही त्यांची खासियत होती. त्यामुळेच अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये त्यांना कधीही कोरियोग्राफरची गरज पडली नाही. ते स्वत:च्या स्टेप्स स्वत: बसवत. त्यांच्या या डान्स शैलीमुळे त्यांना ‘डान्सिंग हिरो’ या नावानेही ओळखले जाऊ लागले.

1953 साली ‘जीवन ज्योती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळत शम्मी कपूर यांचे वजन अतिशय कमी होते. सडपातळ देहयष्टीच्या शम्मी कपूर यांना पाहून एकदा मधुबाला यांनी त्यांना वजन वाढवण्याचा सल्ला दिला होता. ‘तुला पाहून मी तुझी हिरोईन आहे, असे मला वाटत नाही. माझ्या मते तुला वजन वाढवायला हवे,’ असे मधुबाला शम्मी कपूर यांना म्हणाल्या. मग काय मधुबालाच्या या शब्दांचा शम्मी कपूर यांच्यावर असा काही प्रभाव झाला की, त्यांनी वजन वाढवण्याचा निश्चय केला.

एका मुलाखतीत शम्मी कपूर यांनी याबद्दल सांगितले होते. ‘मधुबाला यांचा तो सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे मी बिअर प्यायला सुरुवात केली. वजन वाढवण्याचा हा एकच पर्याय मला त्यावेळी सुचला होता,’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.

सुरुवातीच्या काळात शम्मी कपूर  खास ओळख निर्माण करू शकले नाहीत. याचदरम्यान ‘तुमसा नहीं देखा’ हा सिनेमा त्यांना ऑफर झाला. हा सिनेमा हिट व्हावा यासाठी शम्मी कपूर यांनी जीवतोड मेहनत केली. कारण, हा चित्रपट चालला नाही तर करिअर संपले हे ते जाणून होते. यासाठी त्यांनी आपले लूकही बदलले. क्लिन शेव, नवी हेअरकट या सगळ्यांचा परिणाम म्हणजे, चित्रपट हिट झाला. केवळ इतकेच नाही तर शम्मी कपूर यांची हेअरस्टाईल नवी स्टाईल स्टेटमेंट बनली.  1957 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटामुळे शम्मी यांना ख-या अर्थाने यश मिळाले. यानंतर 1959 साली आलेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटामुळे एक खेळकर प्लेबॉय अशी त्यांची इमेज बनली. 1961 सालच्या ‘जंगली’ या चित्रपटामुळे त्यांची ही इमेज आणखीच दृढ झाली. त्यानंतर त्यांनी अशाच धाटणीचे अनेक चित्रपट केलेत.

 

टॅग्स :शम्मी कपूर