Join us  

आता मृत्यू जवळ येतोय...! कोरोनाचा हाहाकार बघून शक्ती कपूर यांना भरली धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 11:32 AM

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. देशातील ही भीषण स्थिती पाहून अभिनेता शक्ती कपूर हेही हवालदिल झाले आहेत. 

ठळक मुद्दे  कोरोना महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून शक्ती कपूर घरीच आहेत. फार क्वचित ते घराबाहेर पडतात.

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात हाहाकार (Corona Virus Outcry) माजला आहे. देशात सर्वत्र ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांचा प्रचंड तुटवडा भासतोय. अनेक रूग्ण ऑक्सिजन व बेड्स अभावी प्राण गमवत आहेत. नातेवाईकांच्या डोळ्यांदेखत आपल्या आप्तांना मरताना पाहत आहेत. बेड मिळाला असता तर तो जगला असता, ऑक्सिजन मिळला असता तर वाचला असता अशा करूण हुंदक्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. देशातील ही भीषण स्थिती पाहून अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor ) हेही हवालदिल झाले आहेत. आता मृत्यू जवळ आलाये, असे म्हणत त्यांनी ही अगतिकता, मनातील वेदना बोलून दाखवली आहे.

एका ताज्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, हा काळ अतिशय कठीण काळ आहे. सोशल मीडिया उघडायला, न्यूज बघायलाही मला भीती वाटतेय. मृत्यू आता आणखी जवळ आला आहे. आधी मरणार आहे, मरणार आहे असे लोक म्हणायचे आणि दहा वर्षे निघून जायची, पण आता लोक किड्यामुंग्यांसारखे मरत आहेत. मृत्यू आता खूप सोपा झाला आहे. माझ्या मित्राच्या भावाला सकाळी रूग्णालयात भरती केले आणि संध्याकाळी तो जग सोडून गेला. सगळे अकल्पित आहे.परिस्थिती हाताबाहेर जातेय.

मी कोरोना लसीचे दोन डोज घेतले आहेत. लोकांनीही लवकरात लवकर लस घ्यावी. माझ्या मते, आता लस हाच या समस्येवरचा पर्याय आहे, असेही ते म्हणाले. कोरोना महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून शक्ती कपूर घरीच आहेत. फार क्वचित ते घराबाहेर पडतात.

टॅग्स :शक्ती कपूर