Join us  

शाहरूख खान समीक्षकांवर घसरला, म्हणे, चित्रपट आहे; हॉटेल नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 2:08 PM

समीक्षकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी शाहरूख ब-याच दिवसांपासून एका संधीच्या शोधात होता. अखेर ‘क्रिटिक्स फिल्म अवॉर्ड २०१९’च्या निमित्ताने एसआरकेने ही संधी गाठलीच.

ठळक मुद्देशाहरुखचा अलीकडे आलेला ‘झिरो’ फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर शाहरूखचे नाव अनेक चित्रपटांशी जोडले गेले. पण अद्याप त्याने कुठल्याही चित्रपटाचे काम सुरु केलेले नाही.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान गेल्या काही वर्षांत एकही हिट देऊ शकला नाही. खरे तर या वर्षांत शाहरूखने आपल्या भूमिकेबद्दल नवनवे प्रयोग केले. मग तो ‘फॅन’ असो वा ‘झिरो’तील बुटक्या व्यक्तीची व्यक्तिरेखा. पण याऊपरही चाहत्यांनी शाहरूखच्या या चित्रपटांकडे पाठ फिरवली. समीक्षकांनीही शाहरुखच्या या चित्रपटांवर जोरदार टीका केली. समीक्षकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी शाहरूख ब-याच दिवसांपासून एका संधीच्या शोधात होता. अखेर ‘क्रिटिक्स फिल्म अवॉर्ड २०१९’च्या निमित्ताने एसआरकेने ही संधी गाठलीच. पोडियमवर येताच शाहरूख  त्याचे अलीकडचे चित्रपट आणि समीक्षकांची टीका यावर बोलला.

 ‘आम्ही एक कथा गुंफण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतो. लहान-लहान कल्पना कथेत बदलतो. स्टोरी लाईन बनवताना त्यात लॉजिक वापरतो. आमचा चित्रपट वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाणारा असावा, यासाठी आमचे प्रयत्न असतात. आमच्या कथा लोकांना आवडतील, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो,’ असे शाहरूख म्हणाला. यानंतर त्याने समीक्षकांकडे मोर्चा वळवला. ‘मी माझ्या क्रिटिक्स मित्रांना सांगू इच्छितो की. कृपया  केवळ बॉलिवूड स्टार्स म्हणून आमच्याकडे बघू नका आणि ‘स्टार सिस्टिम’पासून दूर राहा.. अनेक वर्षांपूर्वी ‘स्टार सिस्टिम’ सुरु झाली आणि बॉलिवूड या ओझ्याखाली पुरते दबले. कुठल्याही चित्रपटाच्या समीक्षेसाठी केवळ ‘स्टार सिस्टिम’ पुरेशी नाही. ३ स्टार, ३.५ स्टार्स, ५ स्टार्स....हा चित्रपट आहे; हॉटेल नाही. आज जणु समीक्षकांचे पिक आले आहे. अशात फिल्म क्रिटीक्स धोक्यात आले आहेत. कृपया चित्रपटाचा निर्णय प्रेक्षकांवर सोडा, ’असे शाहरूख म्हणाला.शाहरुखचा अलीकडे आलेला ‘झिरो’ फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर शाहरूखचे नाव अनेक चित्रपटांशी जोडले गेले. पण अद्याप त्याने कुठल्याही चित्रपटाचे काम सुरु केलेले नाही. संजय लीला भन्साळींच्या एका आगामी चित्रपटात शाहरूख दिसणार, अशी तूर्तास चर्चा आहे. पण अद्याप याबाबत कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

टॅग्स :शाहरुख खान