Join us

शाहिद कपूरची ‘पद्मावती’ सेल्फी झाली व्हायरल; वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 19:32 IST

गेल्या रविवारी जेव्हा तो सेटवर आला तेव्हा त्याला शूटिंगनंतर काहीकाळ आराम करायचा होता. तत्पूर्वी त्याने एक सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केली.

‘पद्मावती’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा शाहिद कपूर चर्चेत आला आहे. मात्र यावेळेस तो चित्रपटाभोवती फिरत असलेल्या वादामुळे नव्हे तर त्याने शेअर केलेल्या एका सेल्फीमुळे तो चर्चेत आला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात शाहिद एका दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, त्यामध्ये शाहिद व्यस्त आहे. गेल्या रविवारी जेव्हा तो सेटवर आला तेव्हा त्याला शूटिंगनंतर काहीकाळ आराम करायचा होता. तत्पूर्वी त्याने एक सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याची ही सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल की, शाहिदच्या या सेल्फीत असे काय आहे? तर या सेल्फीचे जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की शाहिद सेल्फीत ‘पद्मावती’च्या लूकमध्ये दिसत आहे. चित्रपटात शाहिद ‘पद्मावती’चे पती चित्तौडचे राजा रावल रत्न सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात शाहिद व्यतिरिक्त ‘पद्मावती’च्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंग आहेत. हा चित्रपट महाराणी ‘पद्मावती’ यांच्यावर आधारित आहे. शाहिद त्याच्या भूमिकेसाठी सध्या खूप मेहनत घेत आहे. शिवाय तो या भूमिकेमुळे खूपच उत्साहित आहे. काही दिवसांपूर्वीच न्यू यॉर्क येथे झालेल्या आयफामध्ये शाहिदला ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत होता. विशेष म्हणजे यासाठी शाहिदने त्याच्या चाहत्यांचे जाहीर आभारही मानले होते.  दरम्यान, शाहिदकडे सध्या ‘पद्मावती’ हा एकच चित्रपट आहे. याविषयी जेव्हा त्याला विचारण्यात आले होते, तेव्हा त्याने चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले होते. तसेच जेव्हा शाहिदला ‘पद्मावती’च्या शूटिंगमधून वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या परिवाराला वेळ देण्यास प्राधान्य देतो. काही दिवसांपूर्वीच तो पत्नी मीरा राजपूतसोबत लंचसाठी जात असताना स्पॉट झाला होता. तसेच मुलगी मीशाबरोबरही तो नियमितपणे फोटोज् शेअर करीत असल्याने चर्चेत असतो.