Join us  

'कबीर सिंग'नंतर या तेलगू सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार शाहिद कपूर, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 7:35 PM

'कबीर सिंग' चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता शाहिद कपूरच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे.

'कबीर सिंग' चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता शाहिद कपूरच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. तो तेलगू चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहिद आगामी चित्रपट 'जर्सी'साठी खूप जास्त मानधन घेतो आहे.

'जर्सी' या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

इतकेच नाही तर चित्रपटाशी निगडीत ट्रेड एक्सपर्टने सांगितलं की, '३५ कोटींच्या मानधनाव्यतिरिक्त शाहिदने चित्रपटाच्या प्रॉफीट शेअरमध्ये तीस टक्के भागिदारी मागितली आहे.' या रिमेकचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

जर्सी चित्रपटासाठी शाहिदची निवड करण्याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक गौथम यांनी सांगितले की, 'जर्सी' या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवतानामला आनंद होत आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट सादर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मुख्य चित्रपटातील जादू कायम ठेवण्यासाठी शाहिद कपूर हा सर्वात उत्तम अभिनेता आहे असे मला वाटते.

'जर्सी' या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचं नाव अर्जुन आहे. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली आहे. चित्रपटात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

'जर्सी' चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती अल्लु अरविंद, अमन गिल आणि दिल राजू करणार आहेत.

टॅग्स :शाहिद कपूरकबीर सिंग