Join us  

 संजीव कुमार यांची ही इच्छा शेवटपर्यंत राहिली अधुरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 12:23 PM

आज संजीव कुमार आठवण्याचे कारण म्हणजे, १९३८ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ९ जुलैला त्यांचा जन्म झाला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार संजीव कुमार आज आपल्यात नाहीत. आज संजीव कुमार आपल्यात असते तर ८० वर्षांचे असते. कदाचित आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. पण ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज संजीव कुमार आठवण्याचे कारण म्हणजे, १९३८ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ९ जुलैला त्यांचा जन्म झाला होता.सूरतमध्ये जन्मलेल्या संजीव कुमार यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला असे होते. त्यांचे जवळचे लोक त्यांना हरी भाई याच नावाने बोलवायचे. हरी भाई बॉलिवूडमध्ये आलेत आणि त्यांनी संजीव कुमार हे नवे नाव धारण केले. पुढे हीच त्यांची ओळख बनली.संजीव कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये आंधी, खिलौना , पति, पत्नी और वो' आणि अंगूर या सिनेमांसह अनेक हिट कलाकृती दिल्या आहेत. मात्र शोलेमध्ये त्यांनी वठवलेली ठाकुर बलदेव सिंहची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.याच महान अभिनेत्याची एक इच्छा मात्र शेवटपर्यंत अधुरी राहिली. होय, अंजू महेन्द्रू हिने याबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. अंजू ही संजीव कुमार यांची मानलेली बहीण होती. याच अंजूने संजीव कुमार यांच्या आठवणी ताज्या करताना एका गोष्टीचा खुलासा केला होता. होय, संजीव कुमारची एक इच्छा होती. पण शेवटपर्यंत ती पूर्ण होऊ शकली नाही. ही इच्छा कुठली तर संजीव कुमार यांना मुंबईत स्वत:चा एक बंगला खरेदी करायचा होता. संजीव कुमार यांना एखादा बंगला आवडला की, ते त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यात गुंतून जात. पण तोपर्यंत त्या बंगल्याची किंमत वाढलेली असायची. हा ‘सिलसिला’ अनेक वर्षे चालला. अखेरच्या काळात एक बंगला त्यांना खूप आवडला. त्याच्या खरेदीसाठी संजीव यांनी पैसेही उभे केले. पण नंतर हा बंगला कायदेशीर वादात अडकला असल्याचे त्यांना कळले. या प्रकरणाचा निपटारा होण्याआधीच संजीव कुमार या जगाला सोडून गेलेत. पैसे असूनही मुंबईत ते स्वत:चे घर घेऊ शकले नाहीत.

पडद्यावर गंभीर भूमिका साकारणारे संजीव कुमार खऱ्या आयुष्यात कसे होते, हेही अंजू यांनी या मुलाखतीत सांगितले होते. ज्या महिलांसोबत संजीव यांचे अफेअर राहिले, त्या सर्वांवर त्यांचा कधीच पूर्ण विश्वास नव्हता. या सगळ्या माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करतात, असेच त्यांना वाटायचे. याचमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही़. त्यांना एक भीती कायम छळायची. ती म्हणजे, मृत्यूची़ कारण त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सगळे पुरूष पन्नाशीच्या आत जग सोडून गेलेत. संजीव कुमार यांच्या लहान भावानेही खूप लहान वयात जगाला अलविदा म्हटले. त्यामुळे मृत्यूची भीती संजीव यांच्या मनात घर करून बसली होती. मी लवकर जाणार, असे ते आपल्या जवळच्यांना नेहमी म्हणत आणि कदाचित झालेही असेच. वयाच्या ४७ व्या वर्षी ते सर्वांना सोडून गेलेत.

टॅग्स :संजीव कुमार