रचला जात होता सलमान खानच्या हत्येचा कट! हरियाणा पोलिसांचा धक्कादायक खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 09:45 IST
हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने एक खळबळजनक खुलासा केला आहे. होय, बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या हत्येच्या कटाचा ...
रचला जात होता सलमान खानच्या हत्येचा कट! हरियाणा पोलिसांचा धक्कादायक खुलासा!!
हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने एक खळबळजनक खुलासा केला आहे. होय, बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या हत्येच्या कटाचा खुलासा हरियाणा पोलिसांनी केला आहे. दीर्घकाळापासून सलमान पंजाबचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याच्या निशाण्यावर आहे. काही दिवसांपूर्वी बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड संपत नेहरा याला अटक केली आहे. संपतवर सलमानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नेहराने या कटाची कबुली दिली असल्याचे हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बिश्नोई गँगने नेहराला सलमानवर नजर ठेवून त्याची हत्या करण्याचा आदेश दिला होता. यासंदर्भात नेहराने सलमानच्या मुंबईस्थित घराची रेकी सुद्धा केली होती. सलमानची हत्या केल्यानंतर देश सोडून पळून जाण्याची नेहराची योजना होती. हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत नेहराने सलमानच्या घराच्या बाल्कनीपर्यंतचे अंतर मोजले़ तसेच त्याच्या घराचे काही फोटोही घेतले. आता या प्रकरणात पोलिस पुढे कुठली कारवाई करतात, ते लवकरच कळेलच . राजस्थानचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला खुली धमकी दिली होती. आता आम्ही जे ही करू ते सर्वांदेखत करून. सलमानला तर आम्ही जोधपूरमध्येच मारू, असे त्याने म्हटले होते. काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजात सलमानविरोधात संतापाची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर बिश्नोई समाजाशी संबंधित लॉरेन्स बिश्नोईने जोधपूर कोर्टाबाहेर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई समाज गत ५०० वर्षांपासून काळवीटांच्या संरक्षणासाठी काम करतो आहे. लॉरेन्स बिश्नोई हा एक विद्यार्थी नेता आहे. त्याच्यावर पंजाब, हरियाणा, चंदीगड व राजस्थानात खंडणी वसूली, गोळीबार आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. फरीदकोट पोलिसांनी ५ मार्च २०१५ रोजी लॉरेन्सला विदेशी शस्त्रांसह अटक केली होती. याचप्रकरणात लॉरेन्सला अलीकडे जोधपूर न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.ALSO READ : -तर काय सलमान खानच्या ‘रेस3’ला केवळ २४ तासांत मिळाले सेन्सॉरचे प्रमाणपत्र!!