Join us

सलमान खानच्या किक या चित्रपटाचे चित्रीकरण 2018मध्ये होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 13:25 IST

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसचा किक हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील जुम्मे की रात हे गाणे तर ...

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसचा किक हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील जुम्मे की रात हे गाणे तर प्रचंड हिट झाले होते. हे गाणे स्वतः सलमान खानने गायलेले होते. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी किक 2 ची घोषणा केली होती. साजिद यांच्या घोषणेनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार याची उत्सुकता सलमानच्या सगळ्याच चाहत्यांना लागलेली आहे. पण या चित्रपटाबाबत अधिकृत अशी कोणतीच घोषणा निर्मात्यांकडून केली जात नाहीये. किक या चित्रपटाच्या सिक्वलबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात अनेक चर्चादेखील सुरू आहेत. या चित्रपटात जॅकलिन सलमानसोबत झळकली होती. पण सिक्वलमध्ये जॅकलिनचा पत्ता कट झाला असल्याचेही म्हटले जात होते. जॅकलिनची जागा दुसरी अभिनेत्री घेणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. तसेच या चित्रपटासाठी काही अभिनेत्रींची नावे चर्चेत असल्याचेही म्हटले जात आहे. पण आता किक या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षांत सुरू होणार असल्याचे कळतेय. या चित्रपटाच्या सिक्वलची पटकथा तयार असून या चित्रपटासाठी सलमाननेदेखील होकार दिला आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची अभिनेत्री कोण असणार आणि चित्रपटात इतर कलाकार कोण असणार याबाबत लवकरच यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यानंतर 2018मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. सलमानसोबत आता कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. सलमान सध्या ट्युबलाईट आणि टायगर जिंदा है या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यग्र आहे. यावर्षी त्याच्याकडे तारखाच नसल्याने किक या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरुवात होणार असल्याचे कळतेय.