Join us  

​जॅकी श्रॉफमुळे सलमान खानच्या आयुष्यात आला होता तो लाजिरवाणा क्षण... सलमान आजही विसरू शकला नाही तो दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 6:47 AM

सलमान खान हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. त्याचे चित्रपट म्हटले की, ते दोनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवतात. सध्या त्याचा ...

सलमान खान हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. त्याचे चित्रपट म्हटले की, ते दोनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवतात. सध्या त्याचा टायगर जिंदा है हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाई करत आहे. सलमान हा प्रेक्षकांचा लाडका असला तरी पुरस्कारांच्या बाबतीत तो तितकासा नशीबवान नाहीये. त्याला आजवर केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पुरस्कार मिळाले आहेत. याच एक पुरस्कार सोहळ्यातील एक किस्सा नुकताच सलमानने सांगितला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात सलमानला एका लाजिरवाण्या क्षणाला सामोरे जावे लागले होते. हा क्षण तो त्याच्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असे तो सांगतो.सलमान खानने त्याच्या आयुष्यातील हा किस्सा नुकताच बिग बॉस या कार्यक्रमात सांगितला. सलमानच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हा किस्सा घडला होता. आज इतके वर्षं झाले तरी सलमान तो दिवस आणि तो क्षण विसरू शकलेला नाही. याविषयी सलमान सांगतो, मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका पुरस्कार सोहळ्याला गेलो होतो. या पुरस्कार सोहळ्यात माझी झालेली फजिती मी आजही विसरू शकत नाही. मी त्यावेळी इंडस्ट्रीत खूपच नवीन होतो. त्यामुळे पुरस्कार सोहळे कशा पद्धतीचे असतात मला काहीच माहीत नव्हते. एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याला मी गेलो होतो. तिथे सुरुवातीचे सगळे पुरस्कार प्रदान झाल्यानंतर सर्वात शेवटच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार दिला जाणार होता. सर्वोत्कृष्ट नायकासाठी ज्या नायकांचे नामांकन झाले त्यांची नावे वाचून दाखवण्यात येत होती. जेव्हा माझे नाव पुकारण्यात आले, तेव्हा मला वाटले की, मला हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी माझ्या खुर्चीतून उठलो आणि पुरस्कार घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले, तितक्यात माझ्या कानावर वाक्य पडले की, अॅवॉर्ड गोज टू जॅकी श्रॉफ... आपली फजिती झाली आहे हे माझ्या लक्षात येताच मी स्वतःला कसेबसे सांभाळले आणि जॅकीसाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हा माझ्या आयुष्यातील लाजिरवाणा क्षण होता. Also Read : ​या कारणामुळे सलमान खानने अनुष्का शर्मा-विराट कोहलीच्या रिसेप्शनला नाही लावली हजेरी