Join us  

सलमान खानला ‘दबंगगिरी’ भोवली, गोव्यात ‘नो एन्ट्री’ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 1:34 PM

सलमान खान याचा सनकी स्वभाव चाहत्यांना नवीन नाही. पण त्याचा हाच सनकी स्वभाव त्याला चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्दे  माजी खासदार आणि भाजपचे गोवा सेक्रेटरी नरेंद्र सावईकर यांनीही सलमानचे हे वर्तन योग्य नसल्याचे म्हटले आहे.

 सलमान खान याचा सनकी स्वभाव   चाहत्यांना नवीन नाही. पण त्याचा हाच सनकी स्वभाव त्याला चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. होय, गोवा विमानतळावर  एका चाहत्याने सलमानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि भाईजानची सटकली. रागाच्या भरात सलमानने चाहत्याचा  मोबईल हिसकावून घेतला. क्षणात या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सलमान नेटक-यांच्या निशाण्यावर आला.  आता तर सलमानला   गोव्यात प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडीयाने केली आहे.होय, सध्या सलमानच्या ‘राधे’ या आगामी चित्रपटाचे गोव्यात शूटींग सुरू आहे.  मंगळवारी या शूटींगसाठी सलमान गोव्यात आला. गोवा विमानतळावर सलमान दिसताच चाहत्यांनी त्याला गराडाच घातला. पण सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांना दूर करत त्याला वाट करून दिली. तरीही एक चाहता सलमानबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. हे बघताच सलमानची सटकली व त्याने चाहत्याच्या हातातून मोबाईल हिसकावला. 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. याचपार्श्वभूमीवर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडीयाचे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे.  चाहत्याचा अपमान करणा-या सलमानला जाहीर माफी मागण्यास सांगावी. तसेच त्याच्यासारख्या हिंसक अभिनेत्याला गोव्यात प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

 माजी खासदार आणि भाजपचे गोवा सेक्रेटरी नरेंद्र सावईकर यांनीही सलमानचे हे वर्तन योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सलमानचा विमानतळावरील व्हिडीओही ट्विट केला आहे. सेलेब्रिटी असल्याने चाहते तुझ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी सेल्फी घेणारच. पण तुझे वर्तन मात्र अयोग्य आहे. यामुळे तू माफी मागायला हवी,असे  ट्विट त्यांनी केले आहे.

टॅग्स :सलमान खान