सलमान खानने म्हटले; ‘माझ्यामुळेच माझ्या भावांना इंडस्ट्रीत डावलले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 21:53 IST
बॉलिवूडचा दबंग सलमान खान जे काही बोलतो ते अगदी मनापासून बोलत असतो. यावेळेसदेखील त्याने असेच काही तरी वक्तव्य करून ...
सलमान खानने म्हटले; ‘माझ्यामुळेच माझ्या भावांना इंडस्ट्रीत डावलले’
बॉलिवूडचा दबंग सलमान खान जे काही बोलतो ते अगदी मनापासून बोलत असतो. यावेळेसदेखील त्याने असेच काही तरी वक्तव्य करून उपस्थिताना धक्का दिला. सलमानने म्हटले की, केवळ माझ्यामुळेच माझ्या भावांना सिनेमांमध्ये फारसे काम मिळाले नाही. ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका वेबसाइटशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले. खरं तर सलमान बॉलिवूडमध्ये एवढा यशस्वी झाला असताना सोहेल आणि अरबाज यांना का यश मिळाले नाही? असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्यांना पडला आहे. त्याचाच एकप्रकारे सलमानने खुलासा केला आहे. सलमानच्या मते, सोहेल आणि अरबाजला जो निर्माता चित्रपट आॅफर करीत होता, तो हाच विचार करीत होता की, सलमान यामुळे नाराज तर होणार नाही ना? कारण इंडस्ट्रीत असा एकही निर्माता किंवा दिग्दर्शक नाही, जो सलमानला नाराज करू इच्छितो. प्रत्येकजण आतापर्यंत सलमानची मर्जी सांभाळतानाच बघावयास मिळाले आहेत. कोणीही सोहेल आणि अरबाजला छोट्या-मोठ्या भूमिका आॅफर केल्या नाहीत. खरं तर सलमानचे हे दोन्ही भाऊ चित्रपटांमध्ये जरी फारसे यशस्वी झाले नसले तरी, व्यवसायात त्यांनी आघाडी घेतली आहे. सोहेलच्या अनेक कंपन्या असून, त्याला बिझनेसमॅन म्हणूनच ओळखले जाते. तर अरबाज एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता आहे. दोघांकडेही प्रचंड काम आहे. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. ट्यूबलाइटचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून, सलमानसोबतचा हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट भारत-चीनमध्ये झालेल्या १९६२ च्या युद्धावर आधारित आहे. चित्रपटात एक चिनी अभिनेत्रीही दिसणार असून, सलमानसोबत सोहेलही स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाची दोन गाणी आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले असून, त्यास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.