Join us  

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याची ओळख पटली; CCTV मध्ये कैद झाले आरोपींचे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 7:45 AM

Salman khan residence attacked: पोलिसांच्या हाती एक मोठा  सुगावा लागला असून गोळीबार करणाऱ्या २ व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान(salman khan) याच्या घराबाहेर रविवारी २ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजता सलमान रहात असलेल्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर ही घटना घडली असून संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. इतकंच नाही तर पुन्हा एकदा सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्येच आता पोलिसांच्या हाती एक मोठा  सुगावा लागला असून गोळीबार करणाऱ्या २ व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे.

'ABP live.com'च्या वृत्तानुसार, गॅलक्सीबाहेर घडलेल्या या प्रकारानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. यामध्येच या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. 

गोळीबार करणाऱ्याची पटली ओळख

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. त्यानुसार, गँगस्टर विशाल ऊर्फ कालू हा या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने रोहतकच्या गुरुग्राम येथील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधूंद गोळीबार केला होता. तेव्हापासून तो फरार होता. विशाल हा गुरुग्राम येथील गँगस्टर रोहित गोदरा याच्यासाठी काम करत असल्याचं म्हटलं जातं.

नेमकं काय घडलं गॅलक्सीबाहेर?

सलमान खान वांद्रे येथील गॅलक्सी या इमारतीमध्ये राहतो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सलमान रहात असून तो चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येतो. याच पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत दोन व्यक्तींनी गोळीबार केला. यात एक गोळी ग्रीलच्या खालच्या बाजूला लागली. तर, दुसरी गोळी गॅलरीच्या आतल्या भिंतीला आणि तिसरी गोळी गॅलरीच्या बाहेरच्या भिंतीला लागली. तसंच अजून दोन गोळ्याही झाडल्या.

गोळीबार करुन हल्लेखोर पसार

पहाटे ५ वाजता या हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलरीवर ५ गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते दोघही घटनास्थळावरुन फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, फायरिंग केल्यानंतर दोन्ही आरोपी वेस्टर्न एक्स्प्रेस वे वरुन दहिसरच्या दिशेने रवाना झाले. घटनास्थळावरुन फरार होतांना या दोघांनीही स्थानिक रहिवाश्यांना एक्स्प्रेसच्या दिशेने कसं जायचं हे हिंदीमध्ये विचारलं होतं. त्यामुळे हे आरोपी मुंबईतील नसून दुसऱ्या राज्यातील असल्याचा म्हटलं जात आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँग हिटलिस्टर

गेल्या काही काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्याने सलमानला धिमक्या मिळत आहेत. बिश्नोई समाजात प्राण्यांना आणि खासकरुन हरणांना पूज्य मानलं जातं. त्यामुळे काळवीट शिकार प्रकरणात सलमानचं नाव पुढे आल्यापासून बिश्नोई गँग त्याला इशारे देत आहेत. विशेष म्हणजे सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोई या अकाऊंटद्वारे घेण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पोलीस या अकाऊंटची सत्यता पडताळत आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानसेलिब्रिटीमुंबई